Konkan Railway: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळा, कोकण रेल्वेवर कारने करा प्रवास, दर आणि नियम काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Konkan Railway: गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी मुंबई, ठाण्यातून कोकणात जात असतात. आता त्यांना आपल्या कारसह रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध झालीये.
मुंबई: कोकण रेल्वेने गणेशोत्सवाच्या आधीच प्रवाशांसाठी खास नवी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशात पहिल्यांदाच खासगी चारचाकी गाड्या रेल्वेमार्गे वाहून नेता येणार आहेत. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी कोकण रेल्वेची ही सेवा 23 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण रेल्वेची ही विशेष रेल्वे महाराष्ट्रातील कोलाड येथून सुटून गोव्यातील वेरणा येथे पोहोचेल. रस्ते मार्गाने साधारणत: 22 तासांत होणारा हा प्रवास आता रेल्वेने केवळ 12 तासांत पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून सोयही होणार आहे.
तिकीट दर किती?
कोकण रेल्वेच्या या खास ट्रेनमध्ये प्रत्येक कारसोबत तीन प्रवाशांना प्रवास करण्याची सुविधा असणार आहे. यामध्ये दोन प्रवाशांना तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यात, तर एकाला शयनयान डब्यात जागा मिळेल. एका कारसाठी एकूण 7 हजार 875 रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय तृतीय वातानुकूलितसाठी प्रति प्रवासी 935 रुपये आणि शयनयानसाठी 190 रुपये भाडे आकारले जाईल.
advertisement
कसं असेल वेळापत्रक?
कोकण रेल्वेची ही विशेष ट्रेन दररोज संध्याकाळी 5 वाजता कोलाडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता वेरणाला पोहोचेल. मात्र, रेल्वे सुटण्याच्या किमान तीन तास आधी प्रवाशांनी स्टेशनवर पोहोचणे गरजेचे आहे. किमान 16 कार नोंदवल्या गेल्यासच ही फेरी सुरू केली जाईल, अन्यथा ती रद्द करण्यात येईल. या विशेष सेवेसाठी एकूण 20 बोगी असतील. प्रत्येक बोगीत दोन कार वाहून नेण्याची सोय असेल, तर या रेल्वेगाडीत एकावेळी 40 कार नेण्याची क्षमता आहे.
advertisement
दरम्यान, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखो चाकरमानी दरवर्षी रेल्वेचा प्रवास करतात. त्यामुळे कोकण रेल्वेची ही सुविधा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. आपल्या गाडीसह सुरक्षित, आरामदायक आणि वेळ वाचवणारा प्रवास करण्यासाठी ही खास सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2025 9:40 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळा, कोकण रेल्वेवर कारने करा प्रवास, दर आणि नियम काय?