मुंबईत अनधिकृत भाजी विक्रेत्यांमध्ये खूनी राडा, एकाचा जागीच खेळ खल्लास, तिघांना अटक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईतील गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर दोन भाजी विक्रेत्यांच्या टोळ्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत एका भाजी विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुंबईतील गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या दोन भाजी विक्रेत्यांच्या टोळ्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत एका भाजी विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पश्चिम स्टेशनबाहेर बेस्ट डेपोसमोर ही हत्येची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनधिकृत भाजी विक्रेत्यांच्या एका टोळीने दुसऱ्या टोळीतील व्यक्तीची हत्या केली. ही हत्या जागा आणि व्यवसायातील जुन्या वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोरेगाव पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, तातडीने गुन्हा दाखल केला असून, हल्ला करणारे आई-वडील आणि मुलगा अशा तिघांना अटक केली आहे.
आरोपींना अटक, हत्येचं नेमकं कारण काय?
advertisement
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुकेश ब्रिजमोहन कोरी, ब्रिज मोहन देवताप्रसाद कोरी (वय ५२) आणि सुशीला ब्रिजमोहन कोरे (वय ४८) अशी आहेत. एका भाजीवाल्याच्या टोळीकडून दुसऱ्या भाजीवाल्याच्या टोळीला सातत्याने डिवचण्याच्या जुन्या रागातून हा वाद वाढत गेला आणि अखेरीस त्यात एका व्यक्तीची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, हा वाद नेमका कशावरून झाला, याचा अधिक तपास सुरू आहे.
advertisement
स्थानिकांचा पालिका प्रशासनाविरोधात संताप
गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत भाजीवाल्यांचे मोठे साम्राज्य आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात स्थानिकांनी अनेकदा तक्रारी करूनही मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे. ही हाणामारीची घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेकडून कारवाई होत नसल्यानेच या अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी आणि गुंडगिरी वाढली असल्याचा संताप स्थानिक व्यक्त करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 8:34 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत अनधिकृत भाजी विक्रेत्यांमध्ये खूनी राडा, एकाचा जागीच खेळ खल्लास, तिघांना अटक


