पश्चिम उपनगरातील पाणीबाणीचा प्रश्न मिटणार, उभारणार नवीन जलवाहिनी
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील पश्चिम उपनगरातील अनेक भागामध्ये कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे.
मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणार्या व्यक्तींसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील पश्चिम उपनगरांमध्ये काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे येत्या वर्षभरामध्ये पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी या भागामध्ये सुरळीत पाणी पुरवठा देऊन दिलासा देण्याचं काम केले जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील पश्चिम उपनगरातील अनेक भागामध्ये कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे.
सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नव्या जलवाहिनीसह, जुन्या जलवाहिन्या काढणे आणि भूमिगत शोषण टाकी बसवणेसह अनेक कामे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित केले जाणार आहे. या कामांसाठी बीएमसीने कामाची निविदा प्रसृत केली असून त्यासाठी 6 कोटी 30 लाख रूपये इतका खर्च येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची पाणी साठवण क्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतकी आहे. मुंबईची लोकसंख्या पाहता मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज 4 हजार 463 दशलक्ष लिटर आहे. शिवाय पाण्याची इतर माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते.
advertisement
सात धरणांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून पाण्याची चोरी, जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमुळे पाणी गळती, पाणी मीटरमधील बिघाडसह इत्यादी कारणांमुळे गळतीचे प्रमाण 30 टक्के आहे. काही वेळा विविध विकास कामांमुळे जलवाहिन्यांचे नुकसान होऊन बरेच पाणी वाया जाते. त्यामुळे कमी दाबाने पाणी येते, तर दूषित पाण्याशीही नागरिकांना सामना करावा लागतो. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरवासीयांना याचा सर्वाधिक मनस्ताप होतो. गेल्या काही महिन्यांपासून सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली भागात कमी दाबाने पाणीपुरवठा येत आहे.
advertisement
त्याविरोधात स्थानिकांसह लोकप्रतिनिधींनीही महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठ्यामागील नेमक्या कारणांचा शोध महापालिका घेत आहे. यातील गोरेगाव, मालाडसह काही भागातील पाणी समस्या सुटली आहे. मात्र सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी मागणी होत आहे. जल अभियंता विभाग, मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरांतील के पूर्व या विलेपार्ले पूर्व, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि के पश्चिममधील विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, जुहु, वर्सोवा, लोखंडवाला संकुलमधील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी 150 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी, 250 मिमी, 300 मिमी, 450 मिमी, 600 मिमी आणि 900 मिमी व्यासाची जलवाहिनी पुरविण्यात येणार आहे.
advertisement
जुन्या जलवाहिन्या बदलणे, भूमिगत शोषण टाकी करणे आणि पंप रूम बांधणे यांसह अन्य कामे केली जाणार असून त्यासाठी मंगळवारी निविदा काढली आहे. या कामासाठी 06 कोटी 30 लाख 67 हजार रुपये खर्च येणार आहे. पुढील पावसाळ्याआधी ही कामे पूर्ण करण्यावर महापालिका भर देत आहे. पश्चिम उपनगरांतील गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व, बोरिवली, दहिसर पूर्वेतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या परिसरात पाणीबाणी निर्माण झाली. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक समस्यांशी सामना करावा लागत असून याविरोधात स्थानिकांच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. खासदार, आमदार, माजी नगरसेवकांनी या समस्येविरोधात मुंबई महापालिकेकडे तक्रारीही केल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 9:03 PM IST


