Mega Block: रविवारी बाहेर जायचंय? आधी रेल्वेचं हे वेळापत्रक पाहा
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
ब्लॉक काळात रेल्वे रुळांसह सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल उशिरानं धावतील.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्यानं या दिवशी रेल्वे मार्गावरील डागडुजीची कामं हाती घेतली जातात, जेणेकरून आठवड्याच्या चालू दिवशी प्रवाशांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये. रविवार दिनांक 30 जून रोजी मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या, सहाव्या मार्गिकेवर आणि पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान मध्य रेल्वेनं ब्लॉक घोषित केला आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेनं बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान ब्लॉक जाहीर केलाय. या काळात रेल्वे रुळांसह सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल उशिरानं धावतील. म्हणून वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.
advertisement
पश्चिम रेल्वे (बोरिवली स्थानक ते राम मंदिर स्थानकादरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ब्लॉक)
ब्लॉक काळात अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यापैकी काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, काही लोकल उशिरानं धावतील.
मध्य रेल्वे (ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक)
ब्लॉक काळात पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील मेल-एक्स्प्रेस तिसऱ्या आणि चौथ्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे जलद अप-डाउन लोकल फेऱ्यांसह 18 मेल-एक्स्प्रेसची वाहतूक उशिरानं सुरू असेल.
advertisement
हार्बर रेल्वे (पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 वाजेपर्यंत ब्लॉक)
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी स्थानक ते वाशी, ठाणे ते वाशी, नेरूळ, बेलापूर-नेरूळ आणि उरणदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध असतील.
advertisement
मेमूचा प्रवास कोपरपर्यंतच!
मेमू स्पेशल 01339 वसई रोड-दिवा सकाळी 09.50 वाजता वसई रोडवरून कोपरपर्यंत धावेल. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान ही गाडी रद्द असेल. तर, कोपरवरूनच मेमूचा परतीचा प्रवास सुरू होईल. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणूनच प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवासाचं नियोजन करावं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 29, 2024 10:51 AM IST







