Ranichi Baug: राणीच्या बागेतील पेंग्विन कक्ष बंद राहणार, कारण काय? पुन्हा कधी सुरू होणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Ranichi Baug: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राणीच्या बागेत आता पुढील काही काळ पेंग्विन पाहता येणार नाहीत. असा निर्णय का घेतला? जाणून घेऊ.
मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय, म्हणजेच राणीची बाग ही इथल्या विविध प्राण्यांमुळे प्रसिद्ध आहेच, पण इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे पेंग्विन. मात्र, आता येत्या नव्या वर्षात तब्बल दोन महिन्यांसाठी पेंग्विन कक्ष बंद राहणार आहे. मुंबई महापालिका (BMC) या ठिकाणी पेंग्विनसाठी असलेल्या जागेचा विस्तार करणार आहे. त्यामुळे या काळात पेंग्विनना तात्पुरते त्यांच्या क्वारंटाईन विभागात हलवण्यात येणार आहे.
पेंग्विन कक्षाचा विस्तार होणार
मुंबई महापालिकेकडून (BMC) पेंग्विनसाठी असलेल्या जागेचा विस्तार करण्याचं काम सुरू होणार आहे. सध्या या कक्षाची 1,800 चौरस फूट जागा आहे, ती आता 800 चौरस फूटांनी वाढवली जाणार आहे. हा विस्तार सध्या बांधण्यात येणाऱ्या नवीन मत्स्यालय प्रकल्पाचा भाग आहे.
advertisement
सध्या पेंग्विन विभागात 25 पेंग्विन ठेवण्याची क्षमता आहे आणि सध्या 21 पेंग्विन येथे आहेत. विस्तार झाल्यानंतर पेंग्विनसाठी अधिक जागा मिळणार असून, भविष्यात 10 ते 15 पेंग्विन अधिक ठेवता येतील, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दोन महिन्यांसाठी बंद राहणार प्रदर्शन
या कामादरम्यान पेंग्विनना तात्पुरते त्यांच्या क्वारंटाईन विभागात हलवण्यात येणार आहे. हा तोच विभाग आहे जिथे 2016 साली पेंग्विन मुंबईत आले तेव्हा त्यांना ठेवण्यात आले होते. काम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सुमारे दोन महिने प्रदर्शन बंद राहील.
advertisement
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “या विस्तारामुळे पेंग्विनना अधिक जागा, सुरक्षितता आणि आरामदायी वातावरण मिळणार आहे. नवीन मत्स्यालय आणि पेंग्विन विभाग एकत्र आल्यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक आकर्षक होईल.”
सध्या पेंग्विन कक्षात थंडावा राखण्यासाठी यंत्रणा, पाण्याची स्वच्छता राखणारे सिस्टीम, 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच डॉक्टर, प्राणीपालक आणि अभियंते अशी सर्व सोय आहे.
हंबोल्ट पेंग्विनचा मुंबईत प्रवेश
हंबोल्ट पेंग्विन पहिल्यांदा 26 जुलै 2016 रोजी दक्षिण कोरियातील सियोल येथून आणण्यात आले होते. त्यावेळी 3 नर आणि 5 मादी पेंग्विन आले होते. त्यांपैकी दोन पेंग्विन नंतर आजारी पडून मृत्यूमुखी पडले. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत सुमारे 25 कोटी रुपये पेंग्विनच्या देखभालीसाठी खर्च करण्यात आले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांसाठी हंबोल्ट पेंग्विन हे मोठं आकर्षण आहेत. परदेशात ज्यांना पाहण्यासाठी मोठा खर्च येतो, ते मुंबईत अगदी कमी तिकिटात पाहता येतात.”
advertisement
गेल्या वर्षी (जुलै 2023) मुंबई प्राणिसंग्रहालयाने हैदराबाद प्राणिसंग्रहालयाशी प्राणी देवाणघेवाणीचा प्रस्ताव दिला होता. मुंबईकडे एक अतिरिक्त नर आणि एक मादी पेंग्विन आहेत. त्याबदल्यात त्यांनी सोन्याचा कोल्हा, काळा कासव, मार्श मगर आणि मोर असे प्राणी मागितले होते. मात्र, या प्रस्तावाला अजून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 12:41 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ranichi Baug: राणीच्या बागेतील पेंग्विन कक्ष बंद राहणार, कारण काय? पुन्हा कधी सुरू होणार?


