Mumbai: घटस्फोटाची मागणी केली, संतापलेल्या पतीनं पत्नीला लोकलखाली ढकललं, मुंबई हादरली
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mumbai News: मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली. सततच्या कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून तिची हत्या केली.
मुंबई: मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली. सततच्या कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून तिची हत्या केली. ही हृदयद्रावक घटना दाम्पत्याच्या १३ वर्षांच्या मुलासमोर घडली. रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २० तासांत आरोपी पतीला सुरत येथून बेड्या ठोकल्या आहेत.
पुष्पा गुप्ता असे मृत महिलेचे नाव असून आरोपी राजू गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडच्या रामगड परिसरात राहणाऱ्या या दाम्पत्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. वादाला कंटाळून पुष्पा काही काळ आपल्या माहेरी उत्तर प्रदेशला गेली होती. तिचा भाऊ कमलेश कुमार, जो भारतीय सैन्यात जवान आहे, त्याने मध्यस्थी करण्यासाठी बहिणीला पुन्हा मुंबईत आणले होते.
advertisement
नेमकं काय घडलं?
१४ मार्च रोजी घरात पुन्हा वाद झाल्याने पुष्पाने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर ती नातेवाईकांकडे जाण्यासाठी मुलुंड स्थानकात उभी होती. यावेळी तिचा भाऊ काही सामान विसरल्यामुळे घरी गेला होता. त्यावेळी आरोपी राजूने त्याला घरात कोंडून ठेवले आणि मुलासह स्थानकात गाठले. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर राजूने पुष्पाला घरी परतण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने घटस्फोटाची मागणी करताच संतापलेल्या राजूने तिला थेट धावत्या लोकलसमोर ढकलले.
advertisement
२० तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या
घटनेनंतर आरोपी राजू दादरमार्गे विरार आणि तिथून सुरतला पळून गेला होता. मुंबई रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढला आणि सुरत गुन्हे शाखेच्या मदतीने त्याला अटक केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 7:49 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: घटस्फोटाची मागणी केली, संतापलेल्या पतीनं पत्नीला लोकलखाली ढकललं, मुंबई हादरली








