Mumbai Water News: मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या परिसराला बसेल फटका?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पाली हिल भागातील जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यासाठी वांद्रे पश्चिमेतील काही प्रमुख जंक्शनदरम्यान मुख्य जलवाहिनी नव्याने टाकण्यात येणार आहे. यासाठी आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई: वांद्रे, खार रोड आणि सांताक्रुझ या तीन भागांतील नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. पाली हिल भागातील जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यासाठी वांद्रे पश्चिमेतल्या रामदास नाईक मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग आणि आर.के.पाटकर मार्ग या जंक्शनदरम्यान, 750 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्याने टाकण्यात येणार आहे. तब्बल 16 तासांसाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी 28 मार्च ते रविवारी 29 मार्चपर्यंत नागरिकांना पाण्याच्या समस्या जाणवू शकते. कोणकोणत्या भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि कोणकोणत्या भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, जाणून घेऊया...
750 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्याने टाकण्याचे काम शनिवार, 28 मार्च रोजी रात्री 11 वाजेपासून रविवार, 29 मार्च रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिममधील काही भागांमध्ये पाणी पुरवठा तात्पुरता खंडित होणार असल्याची माहिती आहे. जलवाहिनीच्या जोडणीच्या कामावेळी नागरिकांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुंबईकरांचे या काळामध्ये तारांबळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवस पुरेल इतका पुरेसा पाणीसाठी भरून ठेवण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केलेले आहे.
advertisement
वांद्रे पश्चिमेतील रामदास नाईक मार्ग, स्वामी विवेकानंद रोड आणि आर. के. पाटकर रोडवर महापालिकेकडून नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. पाली हिल जलाशयातील पाणीपुरवठ्याची पातळी सुधारण्यासाठी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना पाण्याचे वितरण व्यवस्थित व्हावे, असे प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. रविवार, 29 मार्च रोजी, एच-वेस्ट वॉर्डमधील अनेक भागांमध्ये पूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर इतर भागांमध्ये पाण्याचा दाब कमी राहील. तर, संपूर्ण खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम, तसेच बाजार रोड, जैन मंदिर रोड आणि डी'मोंटे रोडसह वांद्रे पश्चिममधील काही भागांना त्यांच्या नियमित सकाळच्या वेळेत (पहाटे 04:00 ते सकाळी 08:30) पूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
वांद्रे पश्चिममधील हिल रोड, पेरी रोड, मॅन्युएल गोन्साल्विस रोड, सेंट अँड्र्यूज रोड, सेंट पॉल रोड, डॉमिनिक रोड, आर. के. पाटकर रोड, नवीन आणि जुनी कांतवाडी, रणवार गाव, वरोडा रोड, कार्टर रोड, पाली माला रोड, चिंबई गाव, शर्ली गाव, राजन गाव, माला गाव आणि पाली गाव यांसह अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा सकाळी 10:00 ते दुपारी 02:00 या वेळेत बंद राहील. खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुईम गावठाण, गाझधर बंधाऱ्याचा काही भाग आणि खार पश्चिमच्या काही भागांमध्ये संध्याकाळच्या वेळेत पाणीपुरवठा (संध्याकाळी 05:30 ते रात्री 10:00) कमी दाबाने होणार आहे. याव्यतिरिक्त, शनिवार, 28 मार्चच्या रात्री 10:00 ते मध्यरात्री 01:00 च्या दरम्यान डॉ. आंबेडकर रोड, पाली गावठाण, पाली हिल आणि वांद्रे व खार पश्चिमच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील.
advertisement
बीएमसीने ज्या भागांना पाणी पुरवठा होणार नाही, अशा भागातल्या नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा भरून ठेवण्याचे आणि जपून पाणी वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, नागरिकांना पुढील चार ते पाच दिवस पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 5:25 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water News: मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या परिसराला बसेल फटका?







