'तू जिथे भेटशील, तिथे तुला..., प्रेयसीच्या आई-वडिलांकडून त्रास; मुंबईच्या पोलीसाने उचललं टोकाचं पाऊल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आत्महत्येपूर्वी भैयासाब यांनी एक सविस्तर सुसाईड नोट लिहून ठेवली असून, त्यामध्ये आपल्या मृत्यूला प्रेयसीचे आई-वडील जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलीस दलात चालक म्हणून कार्यरत असलेल्या एका 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. भैयासाब व्हावळे असे या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी होते. आत्महत्येपूर्वी भैयासाब यांनी एक सविस्तर सुसाईड नोट लिहून ठेवली असून, त्यामध्ये आपल्या मृत्यूला प्रेयसीचे आई-वडील जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, भैयासाब व्हावळे यांचे गेल्या दीड वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. मुलीच्या घरच्यांनी धमकी दिल्याचे देखील सुसाईट नोटमध्ये समोर आले आहे. सुसाईड नोटमध्ये भैयासाब यांनी प्रेयसीच्या वडिलांनी दिलेल्या धमक्यांचा उल्लेख केला आहे. तू जिथे भेटशील, तिथे तुला मारून टाकेन, तसेच तू जीव दे, नाहीतर तुझा पोलीस दलातील जॉब घालवतो, अशा धमक्या सातत्याने दिल्या जात होत्या. यामुळे प्रियकर मानसिक तणावात होता.
advertisement
प्रेयसीची आई देखील करायची जाच
केवळ प्रेयसीचे वडीलच नव्हे, तर तिच्या आईकडूनही वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. प्रेयसीच्या आई-वडिलांच्या जाचाला आणि त्यांच्या दबावामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे भैयासाब यांनी चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिले आहे. एका वर्दीतील शिपायाला आपल्या खासगी आयुष्यातील या छळासमोर हार मानावी लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
advertisement
वाकोला पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सुसाईड नोट हस्तगत केली असून, त्याआधारे प्रेयसीच्या आई-वडिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, मोबाईल चॅटिंग आणि कॉल रेकॉर्ड्सचीही पडताळणी केली जात आहे.
advertisement
जळगावच्या आयटीआयच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
जळगाव शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या आयटीआयच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित समाधान पवार, असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहित हा जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. वडील भेटून गेल्यानंतर काही तासांतच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याचा रूममेट परत आल्यानंतर दरवाजा न उघडल्याने कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला असता रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येपूर्वी रोहितने इन्स्टाग्रामवर अकाउंट बंद करण्याबाबतचा संदेश टाकला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 4:16 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'तू जिथे भेटशील, तिथे तुला..., प्रेयसीच्या आई-वडिलांकडून त्रास; मुंबईच्या पोलीसाने उचललं टोकाचं पाऊल






