Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार सुपर हायवे! 10 लेनचा मेगा प्लॅन तयार, कधी पूर्ण होणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवासी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई: मुंबई आणि पुणे या दोन औद्योगिक केंद्रांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सध्याच्या मार्गावर वाहनांची गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार देशातील सर्वात महत्त्वाच्या या महामार्गाचा चेहरामोहरा बदलण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा विस्तार करून 2030 पर्यंत तो 10 लेनचा सुपर हायवे करण्याचे जाहीर केले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरून सध्या दररोज 65,000 वाहने प्रवास करतात. तर वीकेंडला शनिवार आणि रविवारी हा आकडा 1 लाखांच्या वर जातो. वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या एक्स्प्रेस वेच्या विस्ताराची योजना आखली होती. हा द्रुतगती महामार्ग 8 लेनचा करण्यात येणार होता. परंतु, आता यामध्ये बदल करून 10-लेनचा सुपर हायवे बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
14,260 कोटींचा खर्च
मुंबई-पुणे सुपर हायवे 10-लेनचा होणार असल्याने प्रकल्पाच्या खर्चात 1420 कोटींची वाढ झालीये. एकूण बांधकाम खर्च 8,440 कोटी रुपये असून प्रकल्पाचा अंदाजित खर्च 14,260 कोटी आहे. हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यात सरकार 40 टक्के निधी उपलब्ध करून देईल. तर उर्वरित 60 टक्के निधी खासगी वितरकांकडून उभारण्यात येईल. या महामार्गाच्या विस्ताराचे काम 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता असून 2029-30 पर्यंत हा सुपर हायवे पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
advertisement
दरम्यान, सध्याचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे हा 94.6 किमी लांबीचा असून हा महामार्ग नवी मुंबईतील कळंबोलीपासून पुण्याजवळील किवळेपर्यंत आहे. 2002 साली सुरू झालेल्या या महामार्गावर प्रवासी वाहनांची संख्या वाढत आहे. सध्या एक्स्प्रेस वेच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू असून यात खंडाळा घाटातील 10-लेनच्या कामाचा देखील समावेश आहे. नवीन विस्ताराची योजना ही उर्वरित भागासाठी असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 23, 2025 11:33 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार सुपर हायवे! 10 लेनचा मेगा प्लॅन तयार, कधी पूर्ण होणार?








