Prakash Ambedkar : सोनिया गांधींचं उदाहरण देत प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना सल्ला, म्हणाले...
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आयोजित करण्यात आलेलया संविधान सन्मान महासभेतून जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे.
मुंबई, 25 नोव्हेंबर (ऋचा कानोलकर, प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शनिवारी (25 नोव्हेंबर) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्या देशभरात संविधान दिन साजरा केला जाणार आहे. या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वंचितने ही महासभा बोलावली होती. यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केलं. आपल्या भाषणातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही आंबेडकरांनी सल्ला दिला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचं उदाहरण दिलं. आंबेडकर म्हणाले की सोनिया गांधी यांनी जी चूक केली, ती तुम्ही करू नका.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, की मनोज जरांगे पाटील आणि इतर मंडळींना एकच सांगतो. शेक्सस्पिअरचं नाटक आहे, मर्चंट ऑफ व्हेनिस. काँग्रेसच्या सल्लागारानं ते सोनिया गांधींना वापरायला सांगितलं. हिंदी अनुवाद झाला 'मौत के सौदागर'. त्या सल्ल्यामुळे, त्या एका वाक्यानं कांग्रेसचं येणारं सरकार गेलं. जरांगे पाटलांना माझा तोच सल्ला. सल्लागाराचं बिलकुल ऐकू नका. सोनिया गांधींनी केलेली चूक करू नका. घोडे मागे राहिले गाढवं पुढे गेली. इथे कुणी घोडे नाही की गाढव नाही, ही माणसं आहेत. वाचवता येत नाही म्हणून भिडवणं सुरू आहे. शासनानं विकासाच्या योजना आखल्याच नाहीत. आपला विकास करून घ्यायचा असेल तर आरक्षण हा एकच मार्ग आहे हे भासवलं जात आहे.
advertisement
आरक्षण हा विकास नाही, ते प्रतिनिधित्व आहे. आरक्षणवादी आणि विरोधी हे शिक्षणमहर्षी आहेत. भारतातून परदेशात किती विद्यार्थी जातात शिकायला. 20 लाखांहून हा आकडा वर आहे. 40 लाख एका विद्यार्थ्यावर खर्च होतो तर 20 लाखांचा विचार करा. हे विकासाचे विरोधी आहेत. आपल्या संस्था चालल्या पाहिजे म्हणून नवं काही येऊ दिलं नाही. संकुचित शिक्षण, करोडोंचा निधी थांबला असता विकास झाला असता, ती चर्चाच झाली नाही. देशभरात नव्यानं 20 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या. मंत्री झालो बसलो एका स्थळी. हा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर आम्ही म्हटलं, ओबीसी मराठ्यांचं ताट वेगवेगळं पाहिजे. काही प्रश्नांचा निकाल अगोदर निघाला. 40 वर्षात परिस्थिती बदलली आहे, या शासनाच्या अविकसित धोरणामुळे प्रत्येकाला वाटतंय आरक्षण मिळालं तर माझा विकास होईल, असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं.
advertisement
वंचितने या सभेसाठी देशातील अनेक विरोधी पक्षांना आणि नेत्यांना या सभेचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील या सभेला उपस्थित होते. या सभेत देशाचं संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय आणि सद्यस्थिती यावर चर्चा झाली. या सभेतून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी देशातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारवर आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2023 10:34 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Prakash Ambedkar : सोनिया गांधींचं उदाहरण देत प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना सल्ला, म्हणाले...