शिंदेची मोठी खेळी, गिरणगावात ठाकरेंना जबर धक्का; माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ठाकरे गटाच्या दिग्गज नेत्या आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव करत या प्रभागावर महायुतीचा झेंडा फडकावला आहे.
सुमीत सावंत, प्रतिनिधी
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गिरणगाव पट्ट्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एफ/दक्षिण (परळ-शिवडी) आणि एफ/उत्तर (माटुंगा-वडाळा) प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार मानसी मंगेश सातमकर यांनी बाजी मारली आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या दिग्गज नेत्या आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव करत या प्रभागावर महायुतीचा झेंडा फडकावला आहे.
advertisement
मुंबई महापालिकेच्या या प्रभाग समितीतील नगरसेवकांचे संख्याबळ पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. या प्रभागात भाजपचे 5, ठाकरे गटाचे 6, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 3, काँग्रेस 1, समाजवादी पक्ष 1 आणि मनसेचा 1 असे एकूण 17 नगरसेवक आहेत. महायुतीकडे (भाजप 5 + शिवसेना 3) एकूण ८ मतांचे बळ होते, तर ठाकरे गटाकडे 6 मते होती. काँग्रेस, सपा आणि मनसेची भूमिका यात कळीची ठरणार होती.
advertisement
सपाच्या साथीने शिवसेनेने मारली बाजी
संख्याबळ समसमान होण्याच्या शक्यतेमुळे निवडणुकीत मोठी उत्कंठा निर्माण झाली होती. मात्र, मतदानाच्या वेळी 'समाजवादी पक्षा'च्या नगरसेवकाने अनपेक्षितपणे महायुतीच्या उमेदवार मानसी सातमकर यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे महायुतीचे पारडे जड झाले आणि मानसी सातमकर यांचा विजय झाला. गिरणगाव हा शिवसेनेचा (ठाकरे गट) बालेकिल्ला मानला जातो, मात्र तिथेच माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवार श्रीमती मानसी मंगेश सातमकर या 8 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रीमती श्रद्धा श्रीधर जाधव यांना 7 मते मिळाली. राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्षाचे सदस्य या निवडणुकीवेळी अनुपस्थित होते.
advertisement
आज झालेल्या प्रभाग समिती निवडणुकीत कोण निवडून आलं?
- सी अँड डी : भाजप- आकाश पुरोहित (बिनविरोध)
- ए,बी अँड ई : काँग्रेस -ज्ञानराज निकम (विजयी) भाजपच्या रोहिदास लोखंडे यांचा पराभव
- एफ दक्षिण व एफ उत्तर : उबाठा- श्रध्दा जाधव यांचा शिवसेना -मानसी सातमकर यांनी केला पराभव
- आर उत्तर व आर मध्य : भाजप- प्रकाश दरेकर (बिनविरोध)
- आर दक्षिण विभाग : भाजप-लिना देहेरकर (बिनविरोध)
- पी पूर्व व पी पश्चिम : राष्ट्रवादी काँग्रेस- अजित रावराणे यांचा काँग्रेसच्या- हैदर अली शेख यांनी केला पराभव
advertisement
अपक्ष आणि छोट्या पक्षांची मोट बांधण्यात ठाकरे अपयशी
एकीकडे महायुतीने अपक्ष आणि छोट्या पक्षांची मोट बांधण्यात यश मिळवले असताना ठाकरे गटाला आपल्या बालेकिल्ल्यात साथ मिळवण्यात अपयश आल्याचे दिसत आहे. सपाच्या पाठिंब्यामुळे महायुतीला मिळालेला हा विजय येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सूचक मानला जात आहे. मानसी सातमकर यांच्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 5:11 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
शिंदेची मोठी खेळी, गिरणगावात ठाकरेंना जबर धक्का; माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव









