पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा; आमदार मिलिंद नार्वेकर यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई वाकोला उड्डाणपुलाजवळ खड्डे, मेट्रोचे काम आणि अपूर्ण उड्डाणपूल यामुळे वाहतूक कोंडी गंभीर; आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
सुमित सावंत, प्रतिनिधी नागपूर: मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग हा मुंबईकरांसाठी जीवघेणा ठरत आहे. विशेषतः वाकोला उड्डाणपुलाजवळील प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रश्न आता इतका गंभीर बनला आहे की, प्रवाशांना काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासन्तास रस्त्यावर अडकून पडावे लागत आहे. खड्डे, अपूर्ण पूल आणि मेट्रोच्या कामांमुळे या मार्गावर खऱ्या अर्थाने 'महाकोंडी' झाली आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनात विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभापतींकडे केली आहे.
२० मिनिटांचा प्रवास बनतोय १ तासाचा
सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईतील वेळेची किंमत किती मोजावी लागते, याचे उदाहरण नार्वेकर यांनी सभागृहात दिले.
समुद्री किनारा मार्गामुळे नरिमन पॉइंट ते वांद्रे हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत पूर्ण होतो. पुढे वांद्रे ते वाकोला उड्डाणपुलापर्यंतचे थोडके अंतर कापण्यासाठी तब्बल एक तासाचा अवधी लागतो. म्हणजेच, थोड्याच अंतरासाठी मुंबईकरांचे अमूल्य ४० मिनिटे वाया जात आहेत.
advertisement
कोंडीची प्रमुख कारणे
खड्ड्यांचे साम्राज्य: वाकोला उड्डाणपुलावर सर्वत्र खड्डे पडले असल्याने वाहतूक अत्यंत संथ गतीने चालते.
मेट्रोचे बांधकाम: मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्यांचा काही भाग अरुंद झाला आहे.
उड्डाणपुलाची अपूर्ण कामे: काही उड्डाणपुलांची कामे अपूर्ण असल्याने वाहतूक वळवावी लागते.
यामुळे वाकोला उड्डाणपूल ते थेट वांद्रे-वरळी सी-लिंकपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
advertisement
अत्यावश्यक सेवांवर विपरीत परिणाम
या वाहतूक कोंडीचा सर्वात विपरीत परिणाम अत्यावश्यक सेवांवर होत आहे. जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या रुग्णवाहिका चालकांना देखील या गर्दीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते, ज्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेत मदत मिळण्यात अडचणी येत आहेत.
प्रवाशांना आणि वाहनचालकांना या वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे. आमदार नार्वेकर यांनी सभागृहात जोरदार मागणी केली आहे की, वाकोला उड्डाणपुलावरील खड्डेमय रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन ते त्वरित पूर्ण करावे. या मागणीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा; आमदार मिलिंद नार्वेकर यांची हिवाळी अधिवेशनात मागणी







