सातबारा उताऱ्यात या नोंदी असल्यास जमिनीवर होणार कारवाई!
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Satbara Utara : राज्यात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वेगाने वाढत असताना फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबई : राज्यात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वेगाने वाढत असताना फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. मालमत्तेच्या किमती सतत वाढत असल्याने अनेक जण गुंतवणुकीसाठी जमीन खरेदी करत आहेत. परंतु सरकारी नोंदी, सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर नमूद केलेल्या संज्ञा समजून न घेतल्यामुळे अनेकांना मोठा फटका बसतो. अनधिकृत व्यवहार, परवानगीशिवाय विक्री, चुकीच्या नोंदींचा वापर करून फसवणूक अशा प्रकारच्या घटना राज्यभर वाढल्याने जमीन कोणत्या प्रकारची आहे, तिचा व्यवहार कशा अटींवर करता येतो आणि कोणत्या जमिनीवर शासनाचे निर्बंध लागू आहेत, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
advertisement
जुनी शर्तीची जमीन म्हणजे काय?
जमिनीच्या प्रकारांचे वर्गीकरण महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 नुसार केले जाते. यात जमिनी तीन प्रमुख प्रकारांत मोडतात जुनी शर्तीची जमीन (वर्ग 1), नवी शर्तीची जमीन (वर्ग 2) आणि शासकीय पट्टेदार जमीन. सर्वात सुरक्षित जमीन प्रकार म्हणजे जुनी शर्तीची जमीन. सातबारावर ‘खा’ असा उल्लेख असणारी ही जमीन पूर्णपणे खासगी मालकीची असल्याने मालकाला विक्री, खरेदी किंवा इतर व्यवहारांवर कोणतेही निर्बंध नसतात. शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक नसल्याने व्यवहार सरळ आणि कायदेशीर पद्धतीने पार पाडता येतात.
advertisement
नवीन शर्तीची जमीन म्हणजे काय?
याउलट नवीन शर्तीच्या जमिनीवर विविध निर्बंध लागू असतात. पूर्वी इनाम, वतन किंवा पुनर्वसनासाठी दिलेल्या या जमिनीवर सरकारचे नियंत्रण असते. अशा जमिनी विक्री करताना मालकाला शासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय केलेला व्यवहार पूर्णपणे अवैध ठरतो. शिवाय जमिनीच्या हस्तांतरणातून मिळालेल्या रकमेतील एक ठराविक हिस्सा सरकारकडे जमा करावा लागतो. या जमिनीची नोंद गाव नमुना 1-क मध्ये केली जाते आणि व्यवहार करण्यापूर्वी तहसिलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. कमी किमतीत जमीन मिळते म्हणून अनेक लोक अशा जमिनी खरेदी करत असले तरी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्यास जमीन जप्त होण्याचा धोका निर्माण होतो.
advertisement
शासकीय पट्टेदारी
तिसऱ्या प्रकारात शासकीय पट्टेदार जमीन येते. काही शेतकऱ्यांना शासनाकडून तात्पुरत्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर जमीन दिली जाते. अशा जमीनधारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क मिळत नाही आणि पट्ट्याची मुदत संपेपर्यंत ती जमीन विकण्यास मनाई असते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी किंवा खरेदी-विक्रीसाठी हा जमीनप्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो.
advertisement
कोणती काळजी घ्यावी?
जमिनीचे व्यवहार करताना सातबारा, आठ-अ उताऱ्यावर असलेल्या नोंदींचा अभ्यास, जमीन कोणत्या वर्गात मोडते याची खात्री, आणि परवानग्या आवश्यक आहेत का याची माहिती असणे अत्यावश्यक आहे. कमी किमतीत जमीन मिळत असल्याचे आकर्षण अनेकदा मोठ्या फसवणुकीचे कारण ठरते. त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे, सर्व कागदपत्रे तपासणे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे हेच सुरक्षिततेचे सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 12:22 PM IST









