VIDEO : वसईत पुन्हा बिबट्याची चाहूल? CCTV फुटेजमुळे खळबळ माजली, वनविभागाकडून तपास सूरू
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वसई विरारमध्ये बिबट्या दिसून आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी याच परिसरात बिबट्याने दहशत माजवली होती. त्याच ठिकाणी बिबट्या दिसून आल्याचे बोलले जातं आहे.
Vasai Virar News : विजय देसाई, विरार :मिरा भाईंदरमधील सोसायटीमध्ये मध्यंतरी एका बिबट्याने शिरकावकरून अनेकांना जखमी केले होते. या घटनेनंतर वसई विरारमध्ये बिबट्या दिसून आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी याच परिसरात बिबट्याने दहशत माजवली होती. त्याच ठिकाणी बिबट्या दिसून आल्याचे बोलले जातं आहे.या संबंधित सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे.त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने या घटनेचा तपास सूरू केला आहे.
खरं तर 1 जानेवारीच्या मध्यरात्री वसई–विरार महानगरपालिका क्षेत्रातील महामार्गालगत,पालघर बाजूकडून प्रवेशद्वार असलेल्या काशीद कोपर गावात चौधरी कुटुंबियांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका संशयास्पद प्राण्याचा वावर कैद झाला.सदर प्राणी समोरील घराच्या कोंबड्यांच्या पिंजऱ्याजवळ फिरताना व हल्ला करताना दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. फुटेज अस्पष्ट असले तरी या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
या घटनेनंतर रात्री उशिरा घरी परतणाऱ्या काही नागरिकांना या प्राण्याची चाहूल लागल्याचे सांगितले जात आहे.सीसीटीव्हीतील दृश्यांवरून हा प्राणी आकाराने लहान असल्याचे दिसत असून,त्यामुळे त्याची आई किंवा इतर बिबटे परिसरात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.परिणामी नागरिक रात्री व दिवसा देखील झुंडीतूनच ये-जा करताना दिसत आहेत.
प्रकरणाची गंभीर दखल घेत मांडवी वनपरिक्षेत्राच्या वनविभागाने तात्काळ तपास सुरू केला आहे. मात्र प्राथमिक पाहणीत सीसीटीव्हीत दिसणारा प्राणी बिबट्या नसून बाऊल (रानमांजर) किंवा इतर कोणता वन्यप्राणी असण्याची शक्यता वनविभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कारण दिसणाऱ्या प्राण्याची उंची व शेपटीचा आकार बिबट्याशी जुळत नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
advertisement
दरम्यान, या परिसरात वारंवार बिबट्याचा वावर का दिसून येतो, याबाबत गावात चर्चा रंगू लागली आहे. कोपर जंगल परिसरातील दाट झुडपे, मानवी वस्तीजवळ सहज उपलब्ध होणारे कुत्रे, गाई-वासरे, कोंबड्या यांसारखे सावज, पाणवठे तसेच महामार्गाच्या पलीकडे हाकेच्या अंतरावर असलेले तुंगारेश्वर अभयारण्य यामुळे बिबट्याचा संचार होत असावा, अशी चर्चा रहिवाशांमध्ये आहे.
मागील तीन वर्षांतील अशाच दोन घटनांपैकी एका घटनेत वनविभागाने सापळा लावून पुढील पायाला जखमी असलेल्या बिबट्याला जेरबंद केले होते. सध्या तो बिबट्या बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तीन पायांवर आपले जीवन जगत आहे.
advertisement
सीसीटीव्हीतील फुटेज अस्पष्ट असल्याने नेमका प्राणी बिबट्याच आहे की नाही, याची खातरजमा सुरू असल्याचे मांडवी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल प्रशांत देशमुख यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभाग पूर्णपणे सतर्क असून, रहिवाशांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काही संशयास्पद दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
view commentsLocation :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 4:45 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
VIDEO : वसईत पुन्हा बिबट्याची चाहूल? CCTV फुटेजमुळे खळबळ माजली, वनविभागाकडून तपास सूरू









