एक स्प्रे मारला अन् जागीच घेतला जीव, महिलेचा शेजाऱ्यासोबत भयंकर प्रकार, मुंबईला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
विरार पश्चिम येथील एका गृहसंकुलात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेने रागाच्या भरात एका व्यक्तीच्या तोंडावर कीटकनाशक स्प्रे फवारल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विरार: विरार पश्चिम येथील एका गृहसंकुलात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेने रागाच्या भरात एका व्यक्तीच्या तोंडावर कीटकनाशक स्प्रे फवारल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उमेश पवार (५३) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी ४७ वर्षीय महिला कुंदा तुपेकर हिला अटक केली आहे. विरार पश्चिमेकडील जेपी नगर परिसरात मंगळवारी ही गंभीर घटना घडली, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जुन्या वादातून उगावला सूड
विरार पश्चिम येथील जेपी नगर परिसरातील १५ क्रमांकाच्या इमारतीत उमेश पवार (५३) आणि कुंदा तुपेकर (४७) यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये कित्येक दिवसांपासून पाणी भरण्यावरून सतत वाद होत होते. मंगळवारी पुन्हा एकदा हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी कुंदा तुपेकर यांचा राग अनावर झाला. त्यांनी तातडीने घरातून कीटकनाशक स्प्रे आणला आणि रागाच्या भरात तो थेट उमेश पवार यांच्या तोंडावर फवारला.
advertisement
कीटकनाशक तोंडावर फवारल्यामुळे उमेश पवार यांना तीव्र त्रास झाला आणि ते जागेवरच बेशुद्ध होऊन कोसळले. या प्रकारानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे दोन्ही कुटुंबांसह इमारतीतील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे.
महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
या गंभीर घटनेनंतर अर्नाळा सागरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, याप्रकरणी कुंदा तुपेकर हिच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कुंदा तुपेकर हिला पोलिसांनी अटक केली आहे. पाणी भरण्यासारख्या क्षुल्लक घरगुती वादातून शेजारी राहणाऱ्याचा जीव घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 9:12 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
एक स्प्रे मारला अन् जागीच घेतला जीव, महिलेचा शेजाऱ्यासोबत भयंकर प्रकार, मुंबईला हादरवणारी घटना!


