"अराजकता माजवण्याचा कुणालाही...", सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आईची प्रतिक्रिया
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांच्या आई कमलाताई गवई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना एका वकिलाने समोरील भागात येऊन भूषण गवई यांच्या दिशेनं पायातील बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांनी काही दिवसांपूर्वी खजुराहो मंदिरातील तुटलेल्या मूर्तीबाबत दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. संबंधित विषय पुरातत्व विभागाच्या कार्यक्षेत्रात असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. यावेळी गवई यांनी केलेल्या टिप्पणीवरून देशात वादाला सुरुवात झाली.
सुप्रीम कोर्टाने या याचिकेचा उल्लेख 'प्रसिद्धीसाठी दाखल केलेली याचिका' असा केला होता. तसेच याचिकाकर्ता खरंच भगवान विष्णूचा मोठा भक्त असेल, तर त्यानं प्रार्थना करावी आणि थोडं ध्यान करावं, अशी खोचक टिप्पणी देखील गवई यांनी केली होती. याच कारणातून विश्व हिंदू परिषदेनं निषेध व्यक्त केला होता. यानंतर राकेश किशोर नावाच्या वकिलाने गवई यांच्यावर हल्ला केला.
advertisement
या हल्ल्यानंतर सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. देशात अराजकता माजवण्याचा कुणालाही अधिकार नाही. सर्वांनी संविधानिक पद्धतीने आपले प्रश्न मांडावेत, असं कमलाताई यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपला मुलगा आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
कमलाताई गवई नक्की काय म्हणाल्या?
advertisement
सरन्यायाधिशांवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना कमलाताई गवई म्हणाल्या, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वसमावेशक अशी घटना प्रदान केली आहे. लोकांना केंद्रस्थानी ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देशाला सुपूर्द केली. आपण जगा आणि इतरांना जगू द्या, असा घटनेचा मूळ गाभा आहे. या देशात कायदा हातात घेऊन अराजकता माजवण्याचा कुणालाही अधिकार नाही. कृपया आपले प्रश्न आपण शांततेनं आणि संविधानिक मार्गाने सोडवून घ्यावेत, अशी मी विनंती करते, सर्वांचं मंगल होवो."
Location :
Delhi
First Published :
October 07, 2025 2:10 PM IST