Chandrayan 3 : रक्षाबंधनाआधी चांद्रयानाची भारताला मोठी 'भेट'; चांदोमामाच्या गावातून आली आनंदाची बातमी
- Published by:Shreyas
Last Updated:
भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयान-3 ला आढळले आहेत.
मुंबई, 29 ऑगस्ट : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयान-3 ला आढळले आहेत. तसंच चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटॅनियमही असल्याचेही आढळलं आहे. या सर्व मुलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेतला हा मोठा शोध मानला जातोय. चांद्रयानाकडून हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जात आहे.
भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेतील चांद्रयान-3 नं चंद्राच्या गूढ गोष्टींमध्ये खोलवर जाण्यास सुरुवात केली आहे. चांद्रयान-3नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील निरीक्षणाचा मार्ग मोकळा करून महत्त्वपूर्ण डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. चांद्रयानचं ऐतिहासिक टचडाउन होऊन पाच दिवस झाले असून, आता त्याचे सर्व आठ वैज्ञानिक पेलोड अॅक्टिव्ह आहेत.
लँडर विक्रमवरील पेलोड्सपैकी एक असलेल्या चंद्राच्या सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंटमधून (ChaSTE) असे पहिले निष्कर्ष समोर आले आहेत. हा प्रयोग विशेषत: स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी (SPL), विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) आणि अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) यांच्या सहकार्याने ध्रुवीय प्रदेशाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे थर्मल गुणधर्म मोजण्यासाठी विकसित केला गेला आहे.
advertisement
चंद्राचा पृष्ठभाग खूपच असमान आहे आणि वेगवेगळ्या जाडीच्या 'रेगोलिथ' नावाच्या ढिगाऱ्याच्या थरानं झाकलेला आहे. सध्याचा समज असा आहे की, चंद्राचा पृष्ठभाग काहीसा 'फ्लफी' आहे आणि कदाचित तो उष्णतेचा चांगला वाहक नसावा. अंतराळ संशोधकांचं म्हणणं आहे, की नजीकच्या भविष्यात चंद्रावर विस्तारित मानवी उपस्थितीचं नियोजन करण्यासाठी चंद्रावरील मातीचं भिन्न स्वरूप समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
चांद्रयान-3चं लँडर प्रत्येक खोलीवर तापमानातील फरक मोजण्यासाठी चंद्राच्या मातीमध्ये 10 सेमी प्रोब टाकून हा डेटा गोळा करत आहे. यात 10 टेम्प्रेचर सेन्सर बसवलेले आहेत.
चांद्रयान-3 चं रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे आणि त्यातील दोन पेलोड डेटा गोळा करत आहेत. रविवारी रोव्हरला स्वत:पासून तीन मीटर अंतरावर एक चार मीटर व्यासाचं विवर आढळलं. इस्रोकडून रोव्हरला यशस्वीरित्या मार्ग बदलण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे आता ते सुरक्षितपणे आपल्या नवीन मार्गावरून पुढे जात आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) एका निवेदनात म्हटलं आहे.
advertisement
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं (ISRO) शेअर केलेला आलेख चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील 0 ते 50°C पर्यंतचा फरक दर्शवतो. हा फरक लँडरनं विविध खोलीवर नोंदवला आहे. हा डेटा अगदी प्राथमिक आहे आणि तो चंद्रावरील दिवसाच्या वेळेनुसार बदलत राहील, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2023 11:47 PM IST
मराठी बातम्या/देश/
Chandrayan 3 : रक्षाबंधनाआधी चांद्रयानाची भारताला मोठी 'भेट'; चांदोमामाच्या गावातून आली आनंदाची बातमी