कुणाच्या पोरीबाळींचे, सूनांचे फोटो देऊ काय? राहुल गांधी यांच्या CCTV मागणीवर निवडणूक आयोगाचा संताप
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Election Commission On Rahul Gandhi: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांचे फोटो त्यांची परवानगी न घेता सार्वजनिक केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी विचारलं की कोणत्याही मतदाराचं सीसीटीव्ही फुटेज – ती आई असो, सून असो किंवा मुलगी असो – माध्यमांसमोर आणणं योग्य आहे का?
नवी दिल्ली: गेल्या काही दिवासांपासून संपूर्ण देशात चर्चेत असलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी रविवारी निवडणुक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहारमधील 'मतांच्या चोरी'च्या आरोपांना उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की निवडणूक आयोगासाठी कोणताही पक्ष किंवा विरोधक नाही, तर सर्व समान आहेत. राहुल गांधी यांनी लावलेले 'मतांच्या चोरी'चे आरोप त्यांनी फेटाळून लावले.
दरवाजे सर्वांसाठी खुले
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, कोणत्याही तक्रारीसाठी आयोगाचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. 'मतांची चोरी'सारख्या शब्दांचा वापर करणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि अशा प्रकरणांमध्ये न्यायालयात याचिका दाखल करायला हवी होती, असे त्यांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले की मतदारांचे फोटो, नावे आणि ओळख सार्वजनिकरित्या दाखवणे हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे.
ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की- बिहारमध्ये सुरू असलेल्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजनमध्ये मतदार, राजकीय पक्ष आणि बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्या सहकार्याने पारदर्शकपणे काम करत आहेत. ते कागदपत्रांची पडताळणी करत आहेत, सह्या घेत आहेत आणि व्हिडिओद्वारे प्रशंसापत्रेही देत आहेत.
advertisement
मतदारांच्या गोपनीयतेचे उल्लंघन
ज्ञानेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी मतदारांचे फोटो त्यांची परवानगी न घेता माध्यमांसमोर सादर केल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी विचारले की, निवडणूक आयोगाने एखाद्या मतदाराचे, ती कुणाचीही आई, सून किंवा मुलगी असो, तिचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करायला हवे का? त्यांनी जोर दिला की ज्यांची नावे मतदार यादीत आहेत, तेच उमेदवार निवडण्यासाठी मतदान करतात.
advertisement
'मतांच्या चोरी'चे आरोप निराधार
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत एक कोटीहून अधिक कर्मचारी, 10 लाखांपेक्षा जास्त BLOs आणि 20 लाखांपेक्षा अधिक पोलिंग एजंट्स काम करतात. अशा पारदर्शक प्रक्रियेत कोणताही मतदार मतदान चोरी करू शकत नाही. काही नेत्यांनी दुहेरी मतदानाचा आरोप केला, पण पुरावे मागितल्यावर कोणतेही उत्तर मिळाले नाही. असे खोटे आरोप निवडणूक आयोगाला किंवा मतदारांना घाबरवू शकत नाहीत, असे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
advertisement
निवडणूक आयोग मतदारांच्या पाठीशी
ज्ञानेश कुमार यांनी शेवटी सांगितले की- जेव्हा निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या मतदारांना लक्ष्य करून राजकारण केले जाते; तेव्हा आयोग स्पष्ट करू इच्छितो की ते गरीब, श्रीमंत, वृद्ध, महिला, तरुण अशा सर्व स्तरातील आणि सर्व धर्मांच्या मतदारांच्या पाठीशी भेदभावाशिवाय खंबीरपणे उभे होते,आहेत आणि राहतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2025 4:11 PM IST
मराठी बातम्या/देश/
कुणाच्या पोरीबाळींचे, सूनांचे फोटो देऊ काय? राहुल गांधी यांच्या CCTV मागणीवर निवडणूक आयोगाचा संताप