मुलाच्या साखरपुड्याची तयारी करून झोपायला गेले, एका रात्रीत अख्खं कुटुंब संपलं; काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Family Died In Fire : एका घराच्या वरच्या मजल्यावर 4 मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. माहितीनुसार हे कुटुंब दुसऱ्या दिवशी मुलाच्या साखरपुड्यासाठी जाणार होतं.
अहमदाबाद : सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू आहेत. अशाच एका घरात मुलाच्या लग्नाची लगबग सुरू होती. साखरपुडा होणार होता. साखरपुड्याची तयारी करून कुटुंब झोपायला गेलं. पण एका रात्रीत संपूर्ण कुटुंब संपलं. उद्या साखरपुडा आणि आदल्या रात्री कुटुंबातील सगळ्यांचा सदस्यांचा मृत्यू झाला. गुजरातमधील ही धक्कादायक घटना आहे.
गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील दुःखद बातमी. गोध्रा येथील बमरौली रोडवरील एका घराच्या वरच्या मजल्यावर 4 मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये ज्वेलर्स कमल दोशी, त्यांची पत्नी देवल आणि त्यांची दोन मुलं देव आणि राज यांचा समावेश आहे.
घराला लागलेल्या आगीत कुटुंब संपलं आहे. शुक्रवारी घरात भीषण आग लागली. ही दुर्घटना इतकी अचानक घडली की कोणालाही परिस्थिती समजली नाही किंवा त्यावर उपाय करता आला नाही. रात्रीची वेळ होती आणि सर्वजण झोपले होते, त्यामुळे कोणीही वेळेवर बाहेर पडू शकलं नाही. सकाळी घरातून धूर निघताना शेजाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांनी ताबडतोब अग्निशमन विभागाला फोन केला.
advertisement
अग्निशमन दलाची टीम काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचली. त्यांनी धूर बाहेर काढण्यासाठी घराच्या सर्व खिडक्यांच्या काचा फोडल्या. पण जेव्हा ते आत पोहोचले तेव्हा त्यांना वरच्या मजल्यावरील खोल्यांमध्ये चारही जणांचे मृतदेह आढळले.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक तपासात असा संशय आहे की तळघरातील गादी असलेला सोफा आगीचं कारण असू शकतो. अग्निशमन अधिकारी मुकेश अहिर यांनी सांगितलं की, घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद असल्याने धूर बाहेर जाऊ शकला नाही, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. कुटुंब झोपलं होतं आणि त्यांचा मृत्यू गुदमरून झाला असावा.
advertisement
माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथकं घटनास्थळी पोहोचली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि आगीचं नेमकं कारण तपासत आहेत.
कमल दोशी हे गोध्रा येथील वर्धमान ज्वेलर्सचे मालक होते आणि शहरात प्रसिद्ध होते. त्या दिवशी सकाळी हे कुटुंब वलसाड जिल्ह्यातील वापी इथं त्यांचा मुलगा देवच्या लग्न समारंभासाठी निघणार होतं. रात्री उशिरा कुटुंब गाढ झोपेत असताना आग लागली. अपघाताची बातमी मिळताच कुटुंब आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली.
view commentsLocation :
Gujarat
First Published :
November 24, 2025 8:49 AM IST
मराठी बातम्या/देश/
मुलाच्या साखरपुड्याची तयारी करून झोपायला गेले, एका रात्रीत अख्खं कुटुंब संपलं; काय घडलं?


