'20 वर्षांपासून मारायचं होतं, आता संधी मिळाली', माजी मुख्यमंत्र्यावर लग्नात गोळीबार, हल्लेखोर कोण?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Former CM Farooq Abdullah Attack : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर एका लग्न समारंभात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे.
Former CM Farooq Abdullah Attack : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर एका लग्न समारंभात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे. फारुख अब्दुल्ला त्यांच्या सुरक्षारक्षकांसह समारंभातून बाहेर पडत असताना अचानक हा हल्ला झाला. सुदैवाने, गोळी त्यांना लागली नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हल्लेखोराला घटनास्थळीच पकडले. या हल्ल्यात उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांना किरकोळ दुखापत झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर त्यांच्याकडे येत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे. तो त्यांच्या पाठीवर रिव्हॉल्व्हर रोखताना दिसत आहे.
हल्लेखोर नक्की आहे कोण?
पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराची ओळख ६१ वर्षीय कमल सिंग जामवाल अशी झाली आहे. तो जम्मूच्या जुन्या शहरातील रहिवासी असून तो आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याचं सांगितलं जातं आहे. वृत्तानुसार, कमल सिंगचा जन्म १९६३ मध्ये झाला होता. त्याची जम्मूच्या जुन्या शहर परिसरात अनेक दुकानं आहेत. या दुकानांच्या मिळणाऱ्या भाड्यातून तो आपला उदरनिर्वाह करतो. पोलिसांनी त्याच्याकडून एक परवानाधारक पिस्तूल जप्त केले, ज्याचा वापर त्याने फारुख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करण्यासाठी केला होता.
advertisement
आरोपी कमलने चौकशीदरम्यान केलेल्या खुलाशांमुळे सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलने पोलिसांना सांगितले की तो गेल्या २० वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांच्या हत्येचा कट रचत होता. तो फक्त योग्य संधी शोधत होता. आज त्याला कळले की फारुख अब्दुल्ला त्यांच्या चुलत भावाच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
कमललाही लग्नासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. लग्नाच्या गर्दीत तो सहजपणे लक्ष्य करू शकत असल्याने त्याला ही योग्य संधी वाटली. त्याने त्याची परवानाधारक पिस्तूल घेतली. अब्दुला लग्नातून बाहेर जाऊ लागताच त्याने मागून त्याच्यावर हल्ला केला.
advertisement
एनएसजी आणि झेड प्लस सुरक्षा असूनही एवढी मोठी चूक कशी घडली?
फारुख अब्दुल्ला यांना एनएसजी आणि झेड प्लस सुरक्षा आहे. तरीही एक सशस्त्र व्यक्ती त्यांच्या इतक्या जवळ कशी आली? असा प्रश्न मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विचारला आहे. तो एक सुनियोजित कट होता, असं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षदर्शी आमदार एजाज अहमद जान म्हणाले की, हल्लेखोर खूप वेगाने धावत आला आणि त्याने फारुख अब्दुला यांच्या पाठीवर रिव्हॉल्व्हर रोखला. पण सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत तातडीने हल्लेखोराला जमीनीवर पाडलं आणि त्याचं पिस्तूल हिसकावून घेतलं. कमल सिंग हा कोणत्याही संघटनेशी संबंधित आहे का? हल्ल्याचा नेमका हेतू काय होता? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
Location :
Jammu and Kashmir
First Published :
Mar 12, 2026 7:03 AM IST
मराठी बातम्या/देश/
'20 वर्षांपासून मारायचं होतं, आता संधी मिळाली', माजी मुख्यमंत्र्यावर लग्नात गोळीबार, हल्लेखोर कोण?









