वैष्णो देवी मार्गावर भूस्खलनात 5 ठार, यात्रा थांबवली; जम्मूमध्ये महापूर, मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Landslide On Vaishno Devi: जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूर आणि ढगफुटीने हाहाकार माजला आहे. महामार्ग बंद, घरे उद्ध्वस्त आणि यात्रेकरू अडकले असल्याने प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे.
जम्मू: जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी माता वैष्णो देवीच्या यात्रामार्गावर अर्धकुंवारीजवळ अचानक भूस्खलन झाले. जोरदार आवाजासह डोंगरावरून माती आणि प्रचंड दगड खाली घसरून यात्रेकरूंच्या मार्गावर आले. या भीषण दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कटरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोडा येथे घर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा मृत्यू अचानक आलेल्या पुरात झाला.
advertisement
बचाव कार्य सुरु
घटनेनंतर लगेच श्राइन बोर्ड, सुरक्षा यंत्रणा आणि एनडीआरएफच्या टीमने बचाव कार्य सुरु केले. ट्रॅकवर असलेल्या यात्रेकरूंना दोरखंड आणि बॅरिकेडिंगच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवले गेले. जम्मू शहरातील सुंजवां भागात पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
वैष्णो देवी यात्रा थांबवली
श्रद्धाळूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने वैष्णो देवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अर्धकुंवारी ते भवन हा मार्ग बंद केला गेला असून खालचा मार्ग देखील मर्यादित करण्यात आला आहे. सध्या यात्रेवर गेलेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे. दरम्यान जम्मू-कश्मीरच्या अनेक भागांत मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे.
advertisement
शाळांना सुट्टी, परीक्षा स्थगित
खराब हवामानामुळे प्रशासनाने जम्मू विभागातील सर्व शासकीय व खासगी शाळांना २७ ऑगस्टपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. जम्मू-कश्मीर शिक्षण मंडळानेही दहावी आणि अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. बीएसएफने पलौरा कॅम्पमध्ये सुरू असलेली कॉन्स्टेबल (जीडी) भरती परीक्षा स्थगित केली असून आता ती ३ सप्टेंबरला होणार आहे.
advertisement
राष्ट्रीय महामार्ग बंद
डोडा जिल्ह्यात ढगफुटीमुळे 10 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. परिणामी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रामबन जिल्ह्यातील चंदरकोट, केला मोड व बॅटरी चष्मा येथे डोंगरावरून मोठमोठे दगड कोसळल्याने 250 किलोमीटर लांब महामार्गावरील हालचाल थांबवण्यात आली. उधमपूर व काजीगुंड येथे वाहनांना अडवण्यात आले असून, सेनेने गादीगड परिसरात लोकांचे सतत रेस्क्यू सुरू ठेवले आहे.
advertisement
हवामान खात्याचा इशारा
मौसम विभागाने 27 ऑगस्टपर्यंत जम्मू, सांबा, कठुआ, रियासी, उधमपूर, राजौरी, रामबन, डोडा आणि किश्तवाड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पर्वतीय भागात ढगफुटी, अचानक पूर व भूस्खलनाचा गंभीर धोका आहे.
advertisement
तवी नदी उफाळली
उधमपूरमधील तवी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीच्या वर गेले असून 2014 च्या महापुरालाही मागे टाकले आहे. पुढील काही तासांत पाणी जम्मू शहरात आणखी 7-10 फूट वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
प्रशासनाचा इशारा
डीआयजी शिवकुमार शर्मा यांनी संपूर्ण जम्मू विभागात पूराचा इशारा दिला आहे आणि नागरिकांना नद्या-नाल्यांच्या जवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन श्रीनगरहून जम्मूकडे प्रयाण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल व मदतकार्य गतीमान करावे असे आदेश दिले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 6:24 PM IST
मराठी बातम्या/देश/
वैष्णो देवी मार्गावर भूस्खलनात 5 ठार, यात्रा थांबवली; जम्मूमध्ये महापूर, मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प


