पक्षी, प्राण्यांकडून होऊ देऊ नका पिकांचं नुकसान, अगदी कमी खर्चात करा 'हा' उपाय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पक्ष्यांना, प्राण्यांना पिकांवर हल्ला करण्यापासून रोखणं हे जिकीरीचं काम आहे. यासाठी उपलब्ध असणारी उपकरणंदेखील महाग आहेत.
दक्षिण कन्नड, 7 सप्टेंबर : भारतातील मोठी लोकसंख्या आजही उपजिविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. मात्र अनेक भारतीय शेतकरी अजूनही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे पीक उत्पादन कमी प्रमाणात हाती येतं. कमी पीक उत्पादनाची इतर कारणंही असू शकतात. मात्र शेतकऱ्यांसाठी एक अतिशय त्रासदायक समस्या म्हणजे पक्षी, वन्यप्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी.
पक्षी आणि प्राण्यांमुळे पिकांचं होणारं नुकसान हा पीक उत्पादनातला मोठा अडथळा आहे. मात्र पक्ष्यांना, प्राण्यांना पिकांवर हल्ला करण्यापासून रोखणं हे जिकीरीचं काम आहे. यासाठी उपलब्ध असणारी उपकरणंदेखील महाग आहेत. शेतीभोवती विद्युतीकरणाचं कुंपण बांधणं यांसारखे आधुनिक उपाय यामध्ये शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील एका शेतकऱ्याला या समस्येवर एक अतिशय व्यवहार्य आणि किफायतशीर उपाय सापडला आहे. दक्षिण कन्नडमधील बंटवाल तालुक्यातल्या पच्चिनाडका येथील रहिवासी असलेले नेल्सन डिसूझा भात शेती करतात. त्यांच्या शेतातही पक्षी आणि माकडांकडून पिकांचं होणारं नुकसान ही दीर्घकाळापासूनची समस्या आहे. दरवर्षी भात पिकाची कापणी जवळ आली की पिकांचं संरक्षण करणं हे नेल्सन कुटुंबियांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असतं. कारण याच कालावधीत पक्षी आणि माकडं त्यांच्या शेतातील पीकं नष्ट करतात.
advertisement
अथक परिश्रमातून नेल्सन यांनी या समस्येवर उपाय शोधून काढला आहे. ते शेतात फटाके वाजवून मोठा आवाज करतात आणि पक्ष्यांना, माकडांना घाबरवतात. नेल्सन डिसूझा अर्धा इंच व्यासाच्या वाकलेल्या लोखंडी पाईपच्या एका बाजूला एक सुटा फटाका ठेवतात आणि तो पेटवतात. शेतात फेरफटका मारताना पक्षी किंवा माकडं दिसली की फटाके फोडतात. पाईपच्या पलिकडून येणाऱ्या मोठ्या आवाजाने पिकांची नासधूस करणारे पशू-पक्षी घाबरून पळून जातात. अशाप्रकारे केवळ 50 रुपये किंमतीचा लोखंडी पाईप वाकवून त्यात 1 रुपयाचा सुटा फटाका ठेऊन ते आपल्या पिकांचं यशस्वीपणे संरक्षण करतात. खरंतर पशू-पक्ष्यांना घाबरवणं हे योग्य नाही. मात्र पिकांचं संरक्षण करण्यासाठी यापेक्षा किफायतशीर उपाय असूच शकत नाही. वन्य, भटके प्राणी आणि पक्ष्यांपासून आपल्या शेताचं संरक्षण करण्यासाठी नेल्सन डिसूझा इतर शेतकरी मित्रांनादेखील सल्ला देतात.
advertisement
दरम्यान, महाराष्ट्रातील जंगलालगतच्या शेती क्षेत्रात हरीण, रानडुक्करं, माकडं यांसारखे प्राणी आणि इतर पक्षी पिकांचं मोठं नुकसान करतात. यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट होतं. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. मात्र नेल्सन डिसूझा यांनी केलेला हा उपाय सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
Location :
Dakshina Kannada,Karnataka
First Published :
September 07, 2023 6:25 PM IST