केंद्रातील सत्तेला लागणार सुरुंग? लालूंची नितीश कुमारांना ऑफर, तेजस्वी यादव म्हणाले...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Nitish Kumar Latest News: आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी नितीश यांना इंडिया आघाडीत सामील होण्याची ऑफर दिली असून यावर मुलगा तेजस्वी यादव यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
पाटणा: बिहारमध्ये विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशा बिहारमधील राजकीय घडामोडीही वाढत आहेत. एनडीए असो वा इंडिया आघाडी, दोन्ही बाजुंचे पक्ष आपापली बाजू भक्कम करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. पण या सगळ्या राजकारणात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार केंद्रस्थानी आहेत. ज्यांच्या पक्षांतराबद्दल प्रत्येक निवडणुकीपूर्वी अटकळ बांधली जाते. अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडींवर पाहता नितीश यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची असणार आहे, हे स्पष्ट आहे.
काही दिवसांपूर्वी आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी नितीश यांना इंडिया आघाडीत सामील होण्याची ऑफर दिली होती. एवढेच नाही तर त्यांनी नितीश बाबूंना माफ केल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. यानंतर गुरुवारी त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. नितीश कुमार यांना सत्तेतून हटवण्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं. या दोन्ही विधानांमुळे आरजेडीमधील गोंधळ चव्हाट्यावर आला. मीडियाला शांत करण्यासाठी लाल प्रसाद यादवांनी हे वक्तव्य केलं होतं, असंही तेजस्वी यादव म्हणाले.
advertisement
बिहारमध्ये पिता-पुत्रांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे आता सत्ताधारी पक्षाला आरजेडीवर निशाणा साधण्याची संधी मिळाली. नितीश कुमार एनडीएमध्ये आहेत, एनडीएमध्येच राहतील, असे जेडीयू नेते लालन सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी लालू यादव यांच्यावरही निशाणा साधला. दुसरीकडे भाजपने लालू यादव यांच्या वक्तव्याला आरजेडीची कमजोरी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने नितीश कुमार यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर दाखवला असून पक्षाचे नेते शकील अहमद यांनी नितीशकुमार यांना गांधीवादी नेते म्हटले आहे. ते म्हणाले की, नितीश कुमार गांधीवादी आहेत, ते गांधींच्या तत्त्वांचे पालन करतात.
advertisement
त्यामुळे आता नितीश कुमार यांच्याबाबत आरजेडीच्या मनात काय चालले आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे त्यांना आपल्या गोटात सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि दुसरीकडे त्यांना सत्तेतून बेदखल करण्याचे दावे केले जात आहेत. नितीश कुमार यांच्याशिवाय बिहारमध्ये सत्तेच्या खुर्चीवर बसणे शक्य नाही, हे RJD आणि BJP या दोन्ही पक्षांना माहीत आहे. त्यामुळे JDU कोणत्या बाजूला सामील होणार, यावरून इथली सत्तेची समीकरणे ठरू शकतात. पण नितीश कुमारांनी बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांना हात दिला, तर केंद्रातील मोदी सरकार धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे नितीश कुमारांना अशाप्रकारे जाऊ देणं मोदींसाठी धोक्याची घंटा असेल.
Location :
Patna,Bihar
First Published :
January 03, 2025 7:02 AM IST
मराठी बातम्या/देश/
केंद्रातील सत्तेला लागणार सुरुंग? लालूंची नितीश कुमारांना ऑफर, तेजस्वी यादव म्हणाले...