20 मिनिटांत शरीरात पसतो आजार, 16 लोकांचा जीव घेणारा ई कोलाय जीवाणू किती घातक?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इंदूरच्या भागीरथपुरा भागात सांडपाणी मिसळल्याने १६ मृत्यू, ३,००० नागरिकांना संसर्ग, ई-कोलाय व साल्मोनेला आढळले, प्रशासनाने क्षेत्र साथीचा रोग म्हणून घोषित केले.
स्वच्छतेसाठी नावाजलेल्या इंदूरमधून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील भागीरथपुरा परिसरात पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळल्याने हाहाकार माजला असून, आतापर्यंत १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. इतकेच नाही, तर तब्बल ३,००० नागरिक या संसर्गाच्या विळख्यात सापडले असून शेकडो जण रुग्णालयात उलट्या आणि जुलाबाने त्रस्त आहेत. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की प्रशासनाने अखेर या भागाला 'साथीचा रोग' प्रभावित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
धक्कादायक खुलासा बोअरवेलमध्ये आढळलं धक्कादायक
तपासणीसाठी जेव्हा या भागातील ६९ बोअरवेलचे पाण्याचे नमुने घेतले गेले, तेव्हा जे वास्तव समोर आले ते अंगावर काटा आणणारे आहे. निम्म्याहून अधिक नमुन्यांमध्ये (३५ ठिकाणी) 'ई-कोलाय' आणि 'साल्मोनेला' सारखे अत्यंत घातक बॅक्टेरिया आढळले आहेत.
यातील 'फेकल कोलायफॉर्म' बॅक्टेरियाचा अर्थ असा की, बोअरवेलमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि सांडपाण्याच्या वाहिन्यांचा एकमेकांशी संपर्क आला आहे. जमिनीखालच्या पाण्यात ही घाण नव्हती, पण खराब झालेल्या पाइपलाईन आणि बोअरवेलच्या दुरावस्थेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली.
advertisement
ई कोलाय किती घातक?
ई-कोलाय हा जीवाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर अत्यंत वेगाने सक्रिय होतो आणि काही प्रकरणांमध्ये अवघ्या २० मिनिटांत त्याचे परिणाम दिसू लागतात, जे पुढे जीवघेणे ठरू शकतात. या धोक्याबद्दल माहिती देताना दिल्ली एम्सचे प्राध्यापक डॉ. शालिमार म्हणतात की, "ई-कोलाय आणि साल्मोनेला हे दोन्ही जीवाणू पिण्याच्या पाण्यात असणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे.
advertisement
प्रामुख्याने मानवी विष्ठेत आढळणारा ई-कोलाय जेव्हा अन्नाद्वारे किंवा सांडपाणी मिश्रित पिण्याच्या पाण्यातून शरीरात जातो, तेव्हा तो रक्ताभिसरण आणि पचनसंस्थेवर थेट हल्ला करतो. यामुळे केवळ तीव्र पोटदुखी किंवा जुलाब होत नाहीत, तर संसर्ग वाढल्यास मूत्रपिंड निकामी होणे आणि 'मल्टी-ऑर्गन फेल्युअर' मुळे रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी हा संसर्ग अत्यंत घातक ठरतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती या आक्रमक जीवाणूचा सामना करू शकत नाही."
advertisement
एम्सच्या डॉक्टरांनी सांगितली भीषण वास्तव
या गंभीर परिस्थितीवर दिल्ली एम्सचे प्राध्यापक डॉ. शालिमार यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यांच्या मते, 'ई-कोलाय' हा बॅक्टेरिया प्रामुख्याने मानवी विष्ठेत आढळतो. पिण्याच्या पाण्यात तो सापडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. साल्मोनेला आणि ई-कोलाय शरीरात गेल्यास पोटदुखी, ताप आणि तीव्र जुलाब होतात. पण हे इतक्यावरच थांबत नाही; लहान मुले, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये हा संसर्ग इतक्या वेगाने पसरतो की शरीरातील एकामागून एक अवयव निकामी होऊ लागतात आणि रुग्ण दगावतो.
advertisement
रुग्णालयांत रुग्णांचा ओघ; प्रशासन खडबडून जागे
भागीरथपुरा भागात सध्या भयाण शांतता आहे. काही दिवसांपूर्वी अचानक लोकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि काही तासांतच रुग्णांची संख्या शेकडोवर पोहोचली. अनेक रुग्णांचे किडनी आणि लिव्हर निकामी झाल्याने त्यांना वाचवता आले नाही.
सध्या आयसीएमआर आणि तज्ज्ञांचे पथक या मृत्यूंच्या तांडवाचा शोध घेत आहे. प्रशासनाने आता खबरदारी म्हणून रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकण्यास बंदी घातली असून, लोकांना टँकरचे पाणीही उकळून पिण्याचा कडक सल्ला दिला आहे.
advertisement
सध्या बाधित भागातील जलकुंभांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात क्लोरिनेशन केले जात आहे. मात्र, १६ बळी गेल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनावर स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. "आम्ही पिण्यासाठी पाणी मागत होतो, आम्हाला विष दिलं गेलं," अशा भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत.
view commentsLocation :
Madhya Pradesh
First Published :
Jan 06, 2026 2:39 PM IST










