भाजप अध्यक्ष बनताच नितीन नबीन यांचा पहिला निर्णय, महाराष्ट्राच्या नेत्याला मोठी जबाबदारी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
नितीन नबीन हे भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच नितीन नबीन यांनी महाराष्ट्राच्या नेत्याला सगळ्यात मोठी जबाबदारी दिली आहे.
नवी दिल्ली : नितीन नबीन हे भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच नितीन नबीन यांनी महाराष्ट्राच्या नेत्याला सगळ्यात मोठी जबाबदारी दिली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर केंद्रीय राज्य मंत्री शोभा करंदलाजे सह-प्रभारी असतील. केरळशिवाय विनोद तावडे यांना चंडीगढ महापौर निवडणुकीचे पर्यवेक्षक म्हणूनही नियुक्त करण्यात आलं आहे.
तेलंगणामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आशिष शेलार यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे माजी अध्यक्ष अशोक परनामी आणि राज्यसभा खासदार रेखा शर्मा या सह-प्रभारी असतील. याशिवाय ग्रेटर बंगळुरू कॉरपोरेशन निवडणुकीसाठी भाजपचे माजी राष्ट्रीय महासचिव राम माधव निवडणूक प्रभारी असतील. राजस्थान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया आणि महाराष्ट्र विधानसभा आमदार संजय उपाध्याय यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
विनोद तावडेंना मोठी जबाबदारी
केरळ हे एकमेव राज्य आहे जिथे अजूनही डाव्यांची सत्ता आहे. केरळमध्ये सत्ता बदलाची परंपरा आहे, पण 2021 मध्ये एलडीएफने ही परंपरा मोडीत काढत लागोपाठ दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलं. काँग्रेस आघाडी यंदा एलडीएफविरोधातल्या असंतोषाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. भाजपला आतापर्यंत केरळमध्ये एकही विधानसभा मतदारसंघात विजय मिळालेला नाही, त्यामुळे विनोद तावडेंना केरळमध्ये भाजपला प्रवेश मिळवून द्यायची मोठी जबाबदारी आली आहे.
advertisement
2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. सुरेश गोपी हे इथले एकमेव खासदार आहेत, त्यांनी सीपीआयच्या व्हीएस सुनिलकुमार यांचा 74 हजार मतांनी पराभव केला होता. गोपी हे पहिल्यांदाच निवडणूक लढले होते. सुरेश गोपी हे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. याशिवाय डिसेंबर 2025 मध्ये भाजपने पहिल्यांदाच तिरुवनंतपुरम नगर पालिकेमध्ये विजय मिळवला होता आणि पहिल्यांदाच इथे भाजपचा महापौर झाला.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Jan 20, 2026 11:15 PM IST
मराठी बातम्या/देश/
भाजप अध्यक्ष बनताच नितीन नबीन यांचा पहिला निर्णय, महाराष्ट्राच्या नेत्याला मोठी जबाबदारी!









