Sesame Seeds : हिवाळ्यात तीळ का खावेत ? थंडी निमित्तानं करुन घेऊयात घरातल्या सुपरफूडची ओळख
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आयुर्वेदात तीळ म्हणजे एक उत्तम औषध आणि विज्ञानात एक पौष्टिक सुपरफूड मानलं जातं. तिळातील पोषक घटक शरीरात सहजपणे शोषले जातात, यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं नैसर्गिकरित्या मिळतात. म्हणूनच हिवाळ्यात तिळाला विशेष महत्त्व आहे.
मुंबई : तब्येत चांगली राहावी म्हणून फिटनेस टिप्स, डाएट टिप्स फॉलो करण्याचं प्रमाण वाढलंय. पण कधीकधी या नादात, स्वयंपाकघरातलेच काही जिन्नस महागड्या उत्पादनांपेक्षा सरस असतात याकडे लक्ष जात नाही.
चांगल्या आरोग्यासाठी मल्टीव्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट्सपेक्षा आपल्या स्वयंपाकघरात असलेलं एक छोटंसं बी अनेक महागड्या गोळ्यांपेक्षा जास्त प्रभावी आहे.
जानेवारी महिन्यात संक्रांतीसाठी घरोघरी तीळगुळ बनवले जातात. या ऋतूत तीळाचे पदार्थ खाण्याचं प्रमाण अधिक असतं. आयुर्वेदात तीळ म्हणजे एक उत्तम औषध आणि विज्ञानात एक पौष्टिक सुपरफूड मानलं जातं. तिळातील पोषक घटक शरीरात सहजपणे शोषले जातात, यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं नैसर्गिकरित्या मिळतात. म्हणूनच हिवाळ्यात तिळाला विशेष महत्त्व आहे.
advertisement
तीळामधे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त आणि मँगनीज सारखी खनिजं भरपूर प्रमाणात असतात. शंभर ग्रॅम पांढऱ्या तिळात अंदाजे 975 मिलीग्राम कॅल्शियम असतं, एका ग्लास दुधापेक्षा हे प्रमाण जास्त असतं.
मजबूत हाडं आणि सांधे यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे आणि तीळामधे नैसर्गिकरित्या हे गुणधर्म आहेत. शिवाय, तिळातील लोह आणि तांबं अशक्तपणाशी लढण्यास मदत करतात. जिममध्ये जाणाऱ्यांसाठीही तीळ प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो.
advertisement
हृदय आणि पचनासाठी देखील फायदेशीर - तीळामधे सेसामिन आणि सेसामोलिन सारखे घटक असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. तिळातील फायबरमुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर करण्यास मदत होते.
काळे आणि पांढरे दोन्ही तीळ आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, पण या दोन्हीचे गुणधर्म थोडे वेगळे आहेत. पांढरे तीळ पचायला सोपे असतात आणि त्यात कॅल्शियम आणि निरोगी चरबीचं म्हणजे हेल्दी फॅट्सचं प्रमाण चांगलं असतं. काळ्या तीळात जास्त लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. कमी हिमोग्लोबिन पातळी, अशक्तपणा आणि केसांच्या समस्यांसाठी ते अधिक फायदेशीर मानले जातात.
advertisement
हिवाळ्यात तीळ खाण्याचे फायदे - आयुर्वेदानुसार, तीळाची प्रकृती उष्ण असते. हिवाळ्यात तीळ खाल्ल्यानं शरीर आतून उबदार राहतं आणि सर्दीशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते. म्हणूनच हिवाळ्यात तिळाचे लाडू, वड्या, गजक आणि इतर पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.
advertisement
दररोज माफक प्रमाणात तीळ खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात, पचन सुधारतं, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि ऊर्जा टिकून राहते. तीळामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते.
दररोज किती तीळ खावेत ? - तीळाची मूळ प्रकृती उष्ण आहे. त्यामुळे तीळ जास्त प्रमाणात खाणं हानिकारक ठरू शकतं. दररोज एक ते दोन चमचे म्हणजे साधारण दहा ते पंधरा ग्रॅम तीळ खाणं पुरेसं मानलं जातं.
advertisement
तीळ जास्त प्रमाणात खाल्ल्यानं पोटात उष्णता निर्माण होते, तसंच वजन वाढणं किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. पण, थोडे भाजलेले तीळ जास्त फायदेशीर असतात. तीळ लाडू, सॅलड, दलिया किंवा फक्त चावूनही तीळ खाऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 10:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sesame Seeds : हिवाळ्यात तीळ का खावेत ? थंडी निमित्तानं करुन घेऊयात घरातल्या सुपरफूडची ओळख










