देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 7 मुलांसह 10 जणांचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रस्त्यावर रक्ताचा सडा आणि मृतदेहांचा खच, देवदर्शन करुन येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 10 जणांचा मृत्यू
बुधवार घातवार ठरला, पहाटेच्या सुमारास देवदर्शन करुन घरी परतणाऱ्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की पिकअप गाडीचा चुराडा झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 12 हून अधिक जखमी आहे. हा भीषण अपघात 4.30 वाजण्याच्या सुमारास झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
रस्त्यावर रक्ताचा सडा होता, मृतदेह खाली पडलेले होते हे दृश्यं अंगावर काटा आणणारं होतं. यावरुन अंदाज लावू शकता हा अपघात किती भयंकर असेल. पॅसेंजर पिकअप आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 10 मृत भाविकांमध्ये 7 लहान मुलं आणि 3 महिलांचा समावेश आहे. हे सर्व भाविक उत्तर प्रदेशचे रहिवासी होते आणि खाटूश्याम मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
advertisement
ही धक्कादायक घटना राजस्थानमधील दौसा इथे घडली आहे. हा अपघात दौसा शहराजवळ झाला. माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या एका ट्रेलरने पिकअप गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पिकअप गाडीचा चक्काचूर झाला. अपघाताचे नेमके कारण समजून शकले नाही. मात्र ट्रेलर गाडी आणि पिकअप यांच्यात झालेल्या धडकेमुळे हा भीषण अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
advertisement
या अपघातात एकूण 12 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 9 जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी जयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृतदेह स्थानिक रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले असून, या अपघाताची सखोल चौकशी केली जात आहे. उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेल्या या भाविकांच्या कुटुंबांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Jaipur,Jaipur,Rajasthan
First Published :
August 13, 2025 7:32 AM IST