शिव, साप आणि त्रिशूळ! राहुल गांधींनी लोकसभेत दिली धर्माची शिकवण, भाजप खासदार भडकले
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
राहुल गांधींनी भगवान शंकराच्या गळ्यातील साप आणि हातातल्या त्रिशूळाकडे लक्ष वेधत त्यांना अहिंसेचं प्रतिक असल्याचं म्हटलं.
दिल्ली : लोकसभेच आज काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधींनी हातात भगवान शंकराचा फोटो घेत भाजपवर टीका केली. राहुल गांधींनी भगवान शंकराच्या गळ्यातील साप आणि हातातल्या त्रिशूळाकडे लक्ष वेधत त्यांना अहिंसेचं प्रतिक असल्याचं म्हटलं. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, भाजपचे लोक स्वत:ला हिंदू समजतात आणि २४ तास हिंसा करतात.
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला. तसंच भाजप खासदारांनी यावेळी सभागृहात गोंधळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं गंभीर विषय आहे. यावर राहुल गांधींनी पुन्हा प्रत्युत्तर देताना म्हटलं की, भाजप म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही. तुम्ही भगवान शंकरांना पाहा, त्यांचा फोटो पाहिल्यावर लक्षात येतं हिंदू दहशत, हिंसा, द्वेष पसरवू नाही शकत. भाजप २४ तास हिंसा, द्वेष, दहशत पसरवते.
advertisement
लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं की, जर तुम्ही भगवान शंकराचा फोटो पाहिला तर समजेल की हिंदू हिंसा करू शकत नाही. भाजपवाले दिवसरात्र हिंसाचाराबद्दल बोलतात. तुम्ही हिंदू असूच शकत नाही. सत्ताधारी हिंदू नाहीत असं म्हणत राहुल गांधी यांनी सभागृहात अभय मुद्रा दाखवली. यानंतर भाजप खासदारांनी आक्षेप घेत राहुल गांधी हे काँग्रेसचं चिन्ह दाखवत असल्याचा आरोप केला.
advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राहुल गांधींच्या विधानावर आक्षेप घेत म्हटलं की, विरोधी पक्षनेत्यांनी स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा करतात असं वक्तव्य केलंय. कोट्यवधी लोक स्वत:ला अभिमानाने हिंदू म्हणवतात. हिंसेच्या भावनेबद्दल संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने विधान केलंय आणि यासाठी त्यांनी माफी मागायला हवी अशी मागणी अमित शहा यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानानंतर भाजप खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. अमित शहा म्हणाले की, इस्लाममध्ये अभय मुद्रा आणि गुरुनानक यांची अभय मुद्रा याबाबत मुस्लीम आणि एसजीपीसींना विचारा. अमित शहांनी असं म्हणताच भाजप खासदारांकडूनही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली गेली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 01, 2024 4:20 PM IST
मराठी बातम्या/देश/
शिव, साप आणि त्रिशूळ! राहुल गांधींनी लोकसभेत दिली धर्माची शिकवण, भाजप खासदार भडकले