World Cup : मोठी बातमी! वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या पराभवानंतर जल्लोष भोवला; 7 विद्यार्थ्यांना अटक, UAPA अंतर्गत कारवाई
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर जल्लोष साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
श्रीनगर, 28 नोव्हेंबर : मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू -काश्मीरमधील गांदरबल येथील शेअ-ए काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील सात विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबरला भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपचा फायनल सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याच्याविरोधात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या एका रिपोर्टनुसार या संदर्भात मुळचे काश्मिरी नसलेल्या विद्यार्थ्यांकडून तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडले. काही लोकांनी यावर आक्षेप घेतला असता त्यांनाही या विद्यार्थ्यांनी धमकावल्याची माहिती समोर येत आहे.
तौकीर भट, मोहसिन फारूक, आसिफ गुलजार वार, उमर नजीर डार, सैयद्द खालिद बुखारी, समीर राशिद मीर आणि उबैद अहमद अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. या सर्वांवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत ज्या विद्यार्थ्यानं तक्रार दिली, त्याने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं की, ऑस्ट्रेलियाचा विजय झाल्यानंतर पाकिस्तानच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. तक्रारकरता विद्यार्थी या विद्यापीठामध्ये पशुपाल विभागामध्ये शिक्षण घेत आहे.
Location :
Srinagar,Jammu and Kashmir
First Published :
November 28, 2023 10:18 AM IST
मराठी बातम्या/देश/
World Cup : मोठी बातमी! वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या पराभवानंतर जल्लोष भोवला; 7 विद्यार्थ्यांना अटक, UAPA अंतर्गत कारवाई