Love Story : सोनिया आणि राजीव गांधी यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा होता विरोध, या एका गोष्टीसाठी दिला होता नकार!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
sonia gandhi birthday : सोनिया गांधी यांच्या आयुष्यात अनेक बरे-वाईट प्रसंग आले; मात्र त्या भारतातच राहिल्या आणि काँग्रेसची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली.
नवी दिल्ली, 09 डिसेंबर : देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली; मात्र त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी ही जबाबदारी त्यांच्या मूलतः भारतीय नसलेल्या सुनेकडे, अर्थात सोनिया गांधी यांच्याकडे आली. त्यांचा आज (9 डिसेंबर) जन्मदिन असतो. अनेक दशकं काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलेल्या सोनिया यांची लोकप्रियता व निष्ठा याबद्दल त्यांचा अनेकांना विशेष आदर वाटतो. देशाच्या राजकारणात व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आयुष्यात त्या कशा आल्या याबद्दल सामान्यांना उत्सुकता असते. त्यांच्या जन्मदिनिमित्त सोनिया गांधी यांच्या आयुष्यातल्या या पैलूबद्दल जाणून घेऊ.
सोनिया गांधी यांचा आज (9 डिसेंबर) वाढदिवस. त्या 77 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म इटलीत झाला, तर इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण झालं. 7 जानेवारी 1965 रोजी सोनिया केंब्रिजला गेल्या. अनेक परदेशी तरुण तिथे शिक्षणासाठी येतात. तिथल्या 2 मुख्य भाषिक शाळांपैकी एका शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. त्या काळी केंब्रिजमध्ये अशी व्यवस्था होती, की तुम्ही परदेशी असाल तर एखाद्या कुटुंबामध्ये तुमच्या राहण्याची व्यवस्था विद्यापीठ करत असे. सोनियांनाही घर देण्यात आलं; मात्र त्यांना तिथलं जेवण आवडत नव्हतं. सुरुवातीला इंग्रजी बोलण्यातही अडचण येत होती. मग त्यांना त्याच कॅम्पसमध्ये एक ग्रीक रेस्टॉरंट सापडलं. तिथे इटालियन खाद्यपदार्थही मिळत होते. त्याचं नाव होतं वर्सिटी. विद्यापीठातल्या तरुणांमध्ये ते खूप लोकप्रिय होतं. त्याच्या किमतीही विद्यार्थ्यांना परवडतील अशा होत्या. राजीव गांधीही अनेकदा मित्रांसह तिथे येत असत.
advertisement
तिथेच सोनिया यांनी राजीव गांधी यांना पहिल्यांदा पाहिलं. ते अत्यंत विनम्र आणि शांत होते. एके दिवशी सोनिया तिथे दुपारचं जेवण घेत असताना राजीव त्यांचे कॉमन मित्र क्रिस्टियन वॉन स्टीगलीज यांच्यासोबत तिथे आले व तेव्हा त्यांची सोनिया यांच्याशी ओळख झाली.
“सोनिया गांधी – अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ, अॅन इंडियन डेस्टिनी” हे सोनिया गांधी यांचं चरित्र राणी सिंग यांनी लिहिलं आहे. त्यात सोनिया यांनी लेखिकेला सांगितलंय, की, “त्या पहिल्याच नजरेत राजीव यांच्या प्रेमात पडल्या. राजीव यांच्यासाठीही तसंच होतं. कारण राजीव यांनीही तिला हे सांगितलं होतं. त्यांनी आधीच क्रिस्टियनला सोनियांशी ओळख करून देण्यास सांगितलं होतं."
advertisement
त्यानंतर सोनिया व राजीव यांच्यात मैत्री झाली. नेहरू-गांधी घराण्यात मोठमोठी पत्रपरंपरा होती. राजीव हेही त्याच परंपरेत वाढले होते. आई इंदिरा गांधी यांना पत्र लिहिताना हळूहळू त्यात सोनिया यांचा उल्लेख येऊ लागला. दोघंही आपापल्या घरापासून लांब राहत होते. राजीव गांधी यांच्याकडे त्या वेळी लाल रंगाची जुनी फोक्सवॅगन कार होती. त्यातून ते सोनिया यांना भेटायला त्या राहत असलेल्या ठिकाणी जायचे. सगळी मित्रमंडळी कधी कधी गाडीतून बाहेर फिरायलाही जात. त्यावेळी इंधनाचे पैसे सगळे मिळून देत. कार रेसिंग पाहण्यासाठी कधी कधी ते सोनिया यांच्यासोबत सिल्व्हरस्टोनला जात असत. हा कार रेसिंगचा प्रसिद्ध ट्रॅक आहे.
advertisement
केंब्रिजमध्ये शिकणाऱ्यांना घरून फार पैसे मिळत नसत. त्यामुळे आर्थिक चणचण जाणवे. त्यामुळे ते विद्यार्थी रिकाम्या वेळात छोटी-मोठी कामं करत. राजीव गांधी एका बेकरीमध्ये पाव तयार करण्याच्या विभागात नोकरी करायचे.
पुस्तकात लिहिलंय, की सोनिया गांधी यांच्याकडे नेहमी पुरेसे पैसे असायचे. त्यांच्या मित्रमंडळींचे खिसे मात्र महिनाअखेरपर्यंत रिकामे व्हायचे. राजीव यांचे केंब्रिजमधले मित्र ताहीर जहांगीर यांनी म्हटलंय, की सोनिया नेहमी नीटनेटक्या कपड्यांमध्ये असयच्या आणि आनंदाने सगळ्यांना भेटायच्या. केंब्रिजमध्ये त्या वेळी मुलं जास्त व मुली कमी शिकत होत्या. पुरुष व स्त्रिया हे प्रमाण 12:1 असं होतं. लांब, काळ्याभोर केसांच्या सोनिया त्या वेळी केंब्रिजमधल्या सर्वांत सुंदर तरुणी होत्या. याची त्यांना जाणीवही होती.
advertisement
राजीव यांना फोटोग्राफीचा छंद होता. ते सोनिया यांचे भरपूर फोटो काढत. ते दोघंही वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरून आले होते; पण त्यांचं नातं हळूहळू घट्ट होत गेलं. राजीव यांनी इंदिराजींना जेव्हा पत्रातून त्यांच्या सोनिया यांच्याबद्दलच्या भावना कळवल्या, तेव्हा त्यांनी इंदिराजींना त्यांना भेटण्याची विनंतीही केली. लालबहादूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये त्या वेळी इंदिरा गांधी माहिती व प्रसारण मंत्री होत्या. त्यांच्या लंडन दौऱ्यावेळी त्या सोनिया यांना भेटणार होत्या. सोनिया गांधी नर्व्हस होत्या. पहिली भेट तर व्यवस्थित झाली. त्यानंतर लगेचच केनिंग्टन पॅलेस गार्डन इथल्या भारतीय उच्चायुक्तांच्या घरी पुढची भेट झाली.
advertisement
इंदिरा गांधी यांनी त्या वेळी सोनिया यांना आरामदायी वाटेल, यासाठी फ्रेंचमधून संवाद साधला. कारण सोनिया यांना इंग्रजीपेक्षा फ्रेंच भाषा जास्त चांगली अवगत होती, हे त्यांना माहीत होतं. शिक्षणाबद्दल चर्चा केली. इंदिरा गांधी यांची ही भूमिका होती; मात्र सोनिया यांच्या घरी या नात्याबद्दल फारसं सकारात्मक वातावरण नव्हतं.
सोनिया यांनी बराच काळ राजीव गांधी व त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगितलं नव्हतं. याबद्दल राजीव यांनी इंदिरा गांधी यांना पत्रात लिहिलं, की सोनिया अजूनही घरी का सांगत नाही, हे समजत नाही. सोनिया यांनी मनापासून हे नातं स्वीकारलं होतं. त्यामुळे इटलीतल्या ओरबासानो इथल्या त्यांच्या घरी जाताना सगळं सांगण्याचं त्यांनी मनोमन ठरवलं होतं. तसं त्यांनी केलंही; पण त्यांचे कुटुंबीय खूश नव्हते. घरच्यांना तर त्यांनी पुन्हा केंब्रिजमध्ये जावं असंच वाटत नव्हतं. नाराज मनानेच त्या केंब्रिजमध्ये परतल्या.
advertisement
दरम्यान, राजीव यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी इंपीरियल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे दोघं फक्त वीकेंडलाच भेटू शकायचे. दोघांनीही आयुष्याचा मोठा निर्णय घेतला होता; पण भविष्याबद्दल दोघांनाही कधी कधी संदिग्धता वाटायची. सोनिया यांना त्यांच्या कडक असलेल्या वडिलांची भीती वाटायची. त्यामुळे दोघांनी लग्न करून भारतात राहायचं ठरवलं.
जुलै 1966मध्ये सोनिया इटलीला परतल्या. राजीव यांनीही सोनिया यांचे वडील स्टेफनो यांना भेटण्याचं ठरवलं. राजीव तेव्हा इंजिनीअरिंग सोडून वैमानिक म्हणून परवाना मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेत होते. नोव्हेंबर 1966मध्ये ते इटलीला गेले. तिथे सोनिया यांच्या पालकांना राजीव भेटले आणि त्यांना ते आवडले; मात्र तरीही सोनिया यांच्या वडिलांनी लग्नाला पटकन होकार दिला नाही. आपली मुलगी परदेशात कशी राहू शकेल, याची त्यांना भीती वाटत होती.
वडिलांनी सोनिया यांना लग्नापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला; पण सोनिया बधल्या नाहीत. मग वडिलांनी एका अटीवर लग्नाला परवानगी दिली. एक वर्ष वाट पाहून मगच लग्न करायचं, या अटीवर सोनिया इटलीला पालकांकडे राहिल्या. एका वर्षात सोनिया राजीव यांना विसरतील, असं सोनिया यांच्या वडिलांना वाटलं होतं; पण तसं झालं नाही. दोघांमधलं प्रेम टिकलं, तरच ते परदेशात राहण्यासाठी परवानगी देतील असं त्यांनी सोनिया यांना सांगितलं होतं.
अखेर 12 महिने वाट पाहिल्यावर सोनिया आणि राजीव यांचं लग्न ठरलं. 13 जानेवारी 1968 रोजी सोनिया दिल्लीला आल्या. त्यांना घेण्यासाठी राजीव आपला भाऊ संजयसोबत गेले होते. सोनिया यांना अमिताभ बच्चन यांच्या घरी त्यांच्या परिवारासोबत राहायला सांगण्यात आलं. नंतर 25 फेब्रुवारी 1968 रोजी त्यांचं लग्न झालं. सोनिया गांधी यांच्या आयुष्यात अनेक बरे-वाईट प्रसंग आले; मात्र त्या भारतातच राहिल्या व काँग्रेसची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली.
Location :
Delhi,Delhi
First Published :
December 09, 2023 8:27 PM IST
मराठी बातम्या/देश/
Love Story : सोनिया आणि राजीव गांधी यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा होता विरोध, या एका गोष्टीसाठी दिला होता नकार!