पुढील ५ दिवस महाराष्ट्र कुडकुडणार, या जिल्ह्यांत सर्वाधिक थंडी असणार, शेतकऱ्यांसाठी सल्ला काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्र झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
राज्यात हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्र झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक, अहमदनगर (अहिल्यानगर), सांगली, सोलापूर, तसेच संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश विभागात पुढील पाच दिवसांपर्यंत, म्हणजेच शनिवार, १५ नोव्हेंबर (लहान एकादशी व आळंदी यात्रा) पर्यंत, रात्री व पहाटेच्या वेळेस जाणवणारी तीव्र थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
advertisement
जळगाव जिल्ह्यात ९.२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा तब्बल ६.७ अंशांनी कमी आहे. त्यामुळे शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात तीव्र थंडीची लाट जाणवली. दुपारी ३ वाजताही कमाल तापमान केवळ २९.७ अंश सेल्सिअस इतकेच होते, जे सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी आहे. परिणामी, दिवसाही गारवा आणि हूडहुडी जाणवली.
advertisement
फक्त जळगावच नव्हे, तर डहाणू, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, जेऊर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड आणि नांदेड या शहरांसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश प्रदेशात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पहाटेच्या सुमारास थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने नागरिकांनी स्वेटर, शाल आणि गरम कपड्यांचा वापर सुरू केला आहे. शेतकरी वर्गही सकाळच्या कामासाठी उशिरा बाहेर पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले.
advertisement
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांपर्यंत राज्यात थंडीचा जोर कायम राहील. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील. रविवार, १६ नोव्हेंबरपासून वातावरणात काही बदल होण्याची शक्यता असून, हवामान खात्याने पुढील अपडेट्स जारी करण्याचे सांगितले आहे.
advertisement
शेतकऱ्यांना इशारा काय? राज्यात सध्या कोरडे आणि थंड वारे वहात असल्याने दिवसभरात आकाश कोरडे असून रात्री गारठा वाढतो आहे. ग्रामीण भागात सकाळी धुके आणि दवबिंदू दिसून येत आहेत. या परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पिकांना चांगले वातावरण मिळत असले तरी, पहाटेची तीव्र थंडी भाज्यांच्या पिकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते, असा इशारा कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.


