'काहीजण मध्येच सोडून गेले…', अपूर्वा नेमळेकरचा 'प्रेमाची गोष्ट' ला अखेरचा रामराम! शेवटच्या पोस्टमध्ये सगळंच सांगून टाकलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Premachi Goshta Serial Will Off Air Soon : 'प्रेमाची गोष्ट' मालिका लवकरच संपणार असून शेवटचं शूटिंग पूर्ण झालं. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर केली.
मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'प्रेमाची गोष्ट' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या आठवड्यात मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असून, नुकतंच मालिकेचं शेवटचं शूटिंग पूर्ण झालं. यावेळी सेटवरचे सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ खूप भावूक झाले होते, कारण गेली दोन वर्षं सुरू असलेला हा प्रवास आता थांबणार आहे.
advertisement
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी या खलनायिकेचं पात्र साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिका संपताना इन्स्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने शूटिंगच्या आठवणी, सेटवरचे फोटो आणि आपल्या मनात दाटलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. अपूर्वाने लिहिलं आहे की, हा दोन वर्षांचा प्रवास खूप सुंदर होता, पण तो अजिबात सोपा नव्हता. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण त्यातच त्यांची खरी परीक्षा होती.
advertisement
अपूर्वा आपल्या पोस्टमध्ये लिहिते, "प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं शेवटचं शूटिंग पूर्ण झालं. खरंतर, कसं व्यक्त होऊ हे कळत नाहीये…कारण, माझ्या मनात आता असंख्य भावना दाटून आल्या आहेत. जवळजवळ दोन वर्षांचा हा प्रवास होता. अनेक आव्हानं, नव्या गोष्टी शिकण्याची संधी आणि आयुष्यात आलेल्या सुंदर अनुभवांनी परिपूर्ण असा हा प्रवास होता. शेवंताची भूमिका ते सावनी…हा प्रवास एक अभिनेत्री म्हणून देखील खूप काही शिकवून गेला.”
advertisement
या दोन वर्षांच्या प्रवासात आलेल्या अनुभवांबाबतही अपूर्वा मोकळेपणाने बोलली. "हा २ वर्षांचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. आम्ही सुद्धा कठीण काळ अनुभवला आहे. पात्र बदलली, काही कलाकार मध्येच सोडून गेले, सतत होणारे बदल या सगळ्या परिस्थितीत आम्ही खचलो नाही. ती आमची एकप्रकारे परीक्षाच होती," असं अपूर्वाने नमूद केलं.
advertisement
advertisement
सावनीची भूमिका स्वीकारण्यामागचं कारण सांगताना अपूर्वा म्हणाली की, तिला नकारात्मक पात्र साकारण्याचा अनुभव घ्यायचा होता, जेणेकरून तिच्या कामात नवीन रंगछटा जोडता येतील आणि स्वतःला नवीन आव्हानं देता येतील. "सावनीचा लूक, तिचे दागिने, तिचे संवाद आणि तिची देहबोली मी सगळं काही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि या पात्राला पडद्यावर जिवंत केलं," असं तिने सांगितलं.
advertisement
नकारात्मक पात्र साकारताना टीकेचा सामनाही करावा लागतो, हे अपूर्वाने मान्य केलं. ती म्हणाली, "सावनी या पात्राला टीकेचा सामना सुद्धा करावा लागला, कारण नकारात्मक पात्रावर जेव्हा टीका होते तेव्हाच तुमच्या कामाची खरी पोचपावती मिळते." या भूमिकेसाठी तिला 'सर्वोत्कृष्ट खलनायिका' आणि 'द मोस्ट ग्लॅमरस फेस ऑफ द इयर २०२४' असे पुरस्कारही मिळाले. पण, प्रेक्षकांचं प्रेम हेच तिच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस होतं, असं ती आवर्जून सांगते.
advertisement
शेवटी अपूर्वाने शशी-सुमीत प्रोडक्शन्स, स्टार प्रवाह, संपूर्ण टीम, लेखक, सहकलाकार आणि तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. "या मालिकेचा निरोप घेणं हे सोपं नाहीये. पण, म्हणतात ना…काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी तुम्हाला आधीचं काहीतरी संपवावं लागतं. तसंच काहीसं झालंय…मी लवकरच एका नवीन पात्रासह, एका नवीन कथेसह तुम्हा सर्वांच्या भेटीला येईल…सावनी तुमचा निरोप घेतेय…" अशा शब्दात तिने तिच्या चाहत्यांना भविष्यात पुन्हा भेटण्याचं आश्वासन दिलं.
advertisement