नवरात्रीत कोल्हापूरला जाताय? फक्त अंबाबाईच नाही, तर 'ही' 7 प्राचीन मंदिरे तुमची यात्रा करतील पूर्ण, वाचा सर्व माहिती
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Navratri Special : नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूरला येणाऱ्या भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासोबतच शहरातील इतर प्राचीन मंदिरांना भेट देऊन आपली यात्रा अधिक अविस्मरणीय करावी. शहरात...
Navratri Special : नवरात्रीच्या दिवसांमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आणि परदेशातूनही भाविक कोल्हापूरमध्ये येतात. या नवरात्रोत्सवात तुम्हीही कोल्हापूरला भेट देणार असाल, तर तुमची ही यात्रा आणखी अविस्मरणीय करण्यासाठी अंबाबाई मंदिरासोबतच कोल्हापुरातील काही निसर्गरम्य आणि ऐतिहासिक मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता...
advertisement
एकवीरा देवी : अंबाबाईच्या मदतीसाठी धावलेल्या देवींपैकी एकवीरा देवी एक आहे. ही देवी जमदग्नी ऋषींची पत्नी आणि परशुरामाची आई असून, अनेक कुटुंबांची ती कुलदेवता मानली जाते. देवीचा स्वयंभू तांदळा जमिनीखाली सुमारे एक फूट खोल आहे, त्यावर मुखवटा ठेवून पूजा केली जाते. या देवीला 'यमाई देवी' असेही म्हणतात. या मंदिराच्या परिसरात श्री दत्तगुरूंचेही निवासस्थान आहे. हे मंदिर दत्तभिक्षालिंग कॉमर्स कॉलेज, आझाद चौक येथे आहे.
advertisement
मुक्तांबिका देवी : मुक्तांबिका देवी म्हणजे महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन रूपांचे मिश्रण. ही देवी भक्तांना संसारचक्रातून मुक्त करून धन, सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य देते. कर्नाटकातील ‘कोल्लूर’ येथे मूकासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे या देवीला 'मुक्तांबिका' असे नाव मिळाले. या देवीची काळ्या पाषाणाची दीड फूट उंचीची मूर्ती आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे अन्नपूर्णा, कमळ, केवडा अशा विविध रूपांत पूजा बांधली जाते. हे मंदिर साठमारी मागे विवेकानंद वाचनालयाजवळ आहे.
advertisement
पद्मावती देवी : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी इतकेच महत्त्व श्री पद्मावती देवीला आहे. पूर्वी पद्मावर्त राजाच्या वस्तीमुळे या परिसराला 'पद्मालय' असे नाव होते. इथे भक्त प्रल्हादाने घोर तपश्चर्या करून पितृदोषापासून मुक्ती मिळवली होती. शिंपी आणि जैन समाजातील अनेक लोक या देवीचे भक्त आहेत. देवीची अडीच फूट उंचीची मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात विष्णू, नागराज, हनुमान, गणेश यांसारख्या इतर देवताही आहेत. हे मंदिर जयप्रभा स्टुडिओजवळ मंगळवार पेठेत आहे.
advertisement
फिरंगाई देवी : प्राचीन काळी राक्षसांनी थैमान घातल्यावर अंबाबाईने करवीर क्षेत्राचे रक्षण केले. तेव्हा मदत करणाऱ्या देवींपैकी फिरंगाई देवी ही एक आहे. देवीचे मूळ नाव ‘प्रत्यंगिरा’ किंवा 'प्रियांगी' असून, नंतर बोलीभाषेतून ते ‘फिरंगाई’ असे झाले. देवीचा १० इंच उंचीचा शेंदूर लावलेला तांदळा आहे. तिच्यासोबत कानकोबा आणि खोकलोबा या परिवार देवता आहेत. या मंदिरातील अंगारा लावल्यास कानाचे रोग दूर होतात, असा भक्तांचा विश्वास आहे. हे मंदिर शिवाजी पेठेत आहे.
advertisement
श्री अनुगामिनी देवी : श्री अनुगामिनी देवी ही कोल्हापूरची रक्षक देवता आहे. करवीरवासीय योद्धांच्या मृत्यूनंतर त्यांना यमाची पीडा होऊ नये म्हणून ही देवी त्या मृतात्म्यांच्या मागोमाग जाते आणि त्यांना जगदंबेच्या चरणी मुक्ती देते, अशी आख्यायिका आहे. देवीची पाच फूट उंचीची, सहा हातांची मूर्ती असून तिच्या पायाखाली राक्षस आहे. विशाळी अमावस्येला या देवीचा महाप्रसाद व वार्षिक उत्सव असतो. जावळाचा गणपती मंदिरापासून थोड्याच अंतरावर शेतामध्ये हे मंदिर आहे. मंदिराभोवती झाडे असल्यामुळे परिसर निसर्गरम्य आहे.
advertisement
गजेंद्रलक्ष्मी देवी : गजेंद्रलक्ष्मी देवी कमळावर विराजमान आहे. ऐश्वर्याच्या प्रतीक म्हणून तिची उपासना केली जाते. ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून, तीन फूट उंचीची आहे. गजेंद्रलक्ष्मीला प्रथम अष्टदिग्गजांनी आपल्या सोंडेतील अमृतजलाने अभिषेक केला, अशी आख्यायिका आहे. या मंदिराच्या परिसरात हनुमान आणि महादेव यांच्याही परिवार देवता आहेत. हे मंदिर कुंभार गल्ली चर्चजवळ, तोरस्कर चौक, ब्रह्मपुरी येथे पंचगंगा नदीजवळ आहे.
advertisement
महाकाली देवी : सृष्टीच्या प्रारंभी महाविष्णूंच्या कानातून उत्पन्न झालेल्या मधु-कैटभ राक्षसांचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवांनी या देवीची करुणा भाकली होती. तेव्हा विष्णूंच्या शरीरातून ती तेज रूपाने बाहेर प्रकट झाली आणि विष्णूंच्या मदतीने या दैत्यांचा संहार केला. करवीर महात्म्यात सांगितल्यानुसार, अगस्ती मुनींनी त्यांच्या पत्नी लोपामुद्रा यांच्यासह या देवीचे दर्शन घेतले होते. देवीची मूर्ती तीन फूट उंचीची आहे. अक्षय तृतीयेला येथे होमहवन आणि महाप्रसादाचा वार्षिक उत्सव असतो. हे मंदिर साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ येथे आहे.