Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, 8 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
आज 22 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
राज्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कोकण, घाटमाथ्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कायम आहे. आज 22 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
मराठवाड्यात सोमवारी हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या 8 जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे याकाळात साधारणतः वातावरण ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाटही होऊ शकतो. तसेच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसण्याचा अंदाज आहे, तर काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत असू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, पैठण आणि सिल्लोड तालुक्यातील गावांतही मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह धारला, चारणेर, पेंडगाव, आमठाणा, केळगाव, घावडा परिसरातील ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. पुलांवरून पाणी वाहत आहे. शेतांमध्ये पाणी शिरल्याने मका, कपाशी, सोयाबीन, अद्रक या पिकांचे मोठे नुकसान झाले.
advertisement
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरला आहे. सकाळपासून सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने परिसर जलमय झालेला पाहायला मिळत आहे. विशेषतः या प्रकल्पाद्वारे सिल्लोड शहरासह परिसरातील बावीस गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
advertisement
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना सतर्कतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी कामाचे योग्य ते नियोजन करावे, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.