टोमॅटोची लागवड 'अशी' करा, तरच मिळू शकतं बक्कळ उत्पन्न
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची जवळपास प्रत्येक किचनमध्ये आढळते. रोजच्या जेवणातल्या या घटकांपासून शेतकरी बांधवांना किती उत्पन्न मिळतं माहितीये? काही शेतकरी बांधवांवर भाव मिळत नाही म्हणून अगदी टोमॅटो फेकण्याची वेळ येते पण अभ्यासपूर्ण शेती केल्यास यातूनही लाखोंचं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सातारचं बाजारे कुटुंब. (शुभम बोडके, प्रतिनिधी / सातारा)
सातारच्या कराड तालुक्यातील उंब्रजजवळ असलेल्या शिवडे गावचे शेतकरी राहुल सुरेश बाजारे यांचे कुटुंबीय गेली 23 वर्षे आपल्या शेतात टोमॅटोचं उत्पादन घेतात. सहकुटुंबानं केलेल्या या पारंपरिक शेतीत ते पूर्वी वांगी, काकडी, कारली अशा विविध भाज्यांची कमी-अधिक प्रमाणात लागवड करायचे. त्यांची एकूण साडेतेरा एकर बागायत शेती आहे.
advertisement
advertisement
सर्वात आधी जमिनीची सुपीकता सुधारून पिकांचं व्यवस्थित नियोजन करून उत्पन्नवाढीचा अभ्यास केला आणि पूर्ण तयारीनिशी ते या क्षेत्रात उतरले. बाजारे कुटुंबीय 23 वर्षांपासून अधूनमधून टोमॅटोचं उत्पादन घेत होते. त्यातून भरगोस उत्पन्न मिळू लागलं, मग त्यांनी दरवर्षी या पिकात वाढ केली. आज 13 एकर क्षेत्रात त्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे.
advertisement
वर्षातून 2 वेळा ते टोमॅटो लागवडीचं नियोजन करतात. त्यांनी एकरी 4300 रोपांची लागवड केली. प्रत्येक रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल, हवा खेळती राहील याची काळजी घेतली. त्यामुळे कीड, रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन फळांची संख्या वाढल्याचं त्यांनी सांगितलं. अतिरिक्त रासायनिक घटकांच्या वापरातून आपल्या जमिनीचं आरोग्य खराब होत असल्याचं लॉकडाऊन काळात त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी आपल्या शेतात दहा ड्रम तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला.
advertisement
आता टोमॅटोचं एकरी सरासरी 40 टनापर्यंत उत्पादन मिळेल, असा त्यांना अंदाज आहे. महत्त्वाचं म्हणजे सध्या टोमॅटोला 20 ते 40 रुपये प्रति किलोचा बाजार भाव मिळत असल्यानं सरासरी खर्च वगळून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं, असंही त्यांना अपेक्षित आहे. सेंद्रिय घटकांचा वापर फायदेशीर ठरतो. जमिनीची सुपीकता टिकून राहते. मी सेंद्रिय घटकांचा वापर करून प्रगतशील शेती करतोय, तुम्हीसुद्धा करा, असं आवाहन राहुल बाजारे यांनी इतर शेतकरी बांधवांना केलं आहे.