Weather Alert: बर्फासारखी थंडी! गुरुवारी धोका वाढला, महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील तापमानाचा पारा घसरला असून गारठा वाढला आहे. गुरुवारी 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत थंडीचा जोर वाढला असून काही ठिकाणी हाडं गोठवणारी थंडी जाणवत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात थंडीची लाट निर्माण झालीये. पारा घसरला असून हवामान विभागाने 11 डिसेंबर रोजी पुन्हा 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणपट्टा, पालघर परिसरात थंडीचा जोर कायम आहे. सकाळी 17–20°C च्या दरम्यान किमान तापमान नोंदवलं जात आहे. मागील दिवसापेक्षा तापमानात 1–2 अंशांची घसरण झाली असून हवा कोरडी राहिल्यामुळे सकाळ–संध्याकाळी गारठा जाणवत आहे. समुद्रकिनारी वाऱ्याची दिशा उत्तर–पूर्वेकडून असल्यामुळे थंडीचा प्रभाव काहीसा वाढला असून आज दिवसभर हवामान मुख्यतः स्वच्छ आणि थंड राहणार आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. अहिल्यानगर आणि परिसरातही तापमानात मोठी घसरण नोंदली गेली असून हवामान विभागाने इथेही यलो अलर्ट जारी केला आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामीण भाग, अकोले–संगमनेर पट्टा आणि शहर परिसरात किमान तापमान 10–11°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार परिसरात देखील थंडीचा कडाका असून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यासह आसपासच्या परिसरात ‘कोल्ड वेव्ह’ ची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे आजची थंडी मागील दोन–तीन दिवसांच्या तुलनेत अधिक तीव्र जाणवते आहे. 10 डिसेंबरला पुण्यातील किमान तापमान सुमारे 9.5°C पर्यंत खाली आले होते, तर आज 11 डिसेंबरला तापमान 8–9°C च्या आसपास नोंदवले जाण्याची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्याच्या भागांमध्ये तर थंडी कडाका जाणवत असून लोणावळा, मुळशी, भोर घाट परिसरात तापमानात लक्षणीय घसरण झाली आहे.
advertisement
दरम्यान, राज्यात आज दिवसभर हवामान स्थिर पण थंड राहणार आहे. सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांत थंडीची लाट जाणवेल. तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला देखील यलो अलर्ट आहे. पुढील 2-3 दिवस किमान तापमानात पुन्हा घसरण होण्याची शक्यता आहे. दिवसांचे तापमान स्थिर राहील. तर काही जिल्ह्यांत ‘कोल्ड वेव्ह’ सारखी स्थिती जाणवेल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.







