Mumbai Rain: बुधवारी हायअलर्ट! मुंबई-ठाण्यावर पुन्हा धो धो कोसळणार, 24 तास धोक्याचे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: कोकण किनारपट्टीवर पावसाने थैमान घातले आहे. मुंबईसह उपनगरांत देखील अस्मानी संकटानं जनजीवन विस्कळीत झालंय.
गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर परिस्थिती गंभीर झाली आहे. मुंबईतील अनेक भाग जलमय झाले असून कुर्ला, भांडुप परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना स्थलांतरित करावं लागलं. तर कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे घरांमध्ये पाणी घुसले, समुद्रात भरती आली आणि मच्छिमारीवर बंदी घालण्यात आली आहे. आज 20 ऑगस्ट रोजी देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
हवामान विभागाने गेले तीन दिवस मुंबई आणि उपनगरांना रेड अलर्ट दिला होता, त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली, कल्याणसह मुंबई उपनगरातून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. मुंबईत आज ऑरेंज अलर्ट आहे. गेल्या काही दिवसांप्रमाणेच पावसाचा जोर कायम राहील. शहरातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस तर उपनगरांमध्ये जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना बाहेर पडताना वाहतुकीकडे आणि लोकल वेळापत्रकाकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
advertisement
advertisement
हवामान विभागाच्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डहाणू, वसई-विरार परिसरात पावसाचं प्रमाण अधिक असून रेल्वे सेवांवरही याचा परिणाम झाला आहे. विशेषतः डहाणू लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. रस्त्यांवर पाणी असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. किनारी भागांमध्ये जोरदार वारे आणि उंच लाटा यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.किनारी भागांमध्ये जोरदार वारे आणि उंच लाटा यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
advertisement
कोकणातील रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. नद्यांना पूर येण्याची, तर डोंगराळ भागात भूस्खलनाची शक्यता व्यक्त केली गेली आहे. रत्नागिरी जिल्हा ऑरेंज अलर्टवर आहे. येथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट आहे. हलका ते मध्यम पाऊस पडेल, पण समुद्रात मोठ्या प्रमाणावर भरती आणि जोरदार वारे वाहतील. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.


