राहुरीची पोटनिवडणुक बिनविरोध नाहीच! भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच पवारांनी टाकला डाव,'या' शिलेदाराची चर्चा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Rahuri Vidhansabha Bypoll Election : भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
अहिल्यानगर : भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या वारशावर शिक्कामोर्तब करत पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शरद पवार गट अॅक्शन मोडमध्ये
दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ही सक्रिय झाली आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत असून, अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
भाजपचा गड टिकवण्याची धडपड
राहुरी मतदारसंघ हा मागील काही वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने येथे मजबूत पकड निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतरही ही परंपरा कायम ठेवण्यासाठी भाजपने अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवला आहे. ‘शिव निर्धार यात्रा’च्या माध्यमातून ते सध्या मतदारांशी संपर्क वाढवत आहेत.
advertisement
विरोधकांचाही जोरदार प्रचार
दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांनी ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढत मतदारसंघात सक्रियता वाढवली आहे. संभाव्य उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.
2019 चा निकाल निर्णायक
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जामंत्री झाले. मात्र, स्थानिक पातळीवर अपेक्षित प्रभाव निर्माण करण्यात ते अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले जाते.
advertisement
2024 मध्ये मात्र शिवाजीराव कर्डिले यांनी दमदार पुनरागमन करत तनपुरे यांना तब्बल 34 हजार मतांनी पराभूत केले. त्यांच्या या विजयाने भाजपचा गड पुन्हा मजबूत झाला.
साखर कारखान्याचा मुद्दा ऐरणीवर
राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना हा या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. सुमारे 600 कोटी रुपयांच्या कर्जाखाली असलेल्या या कारखान्याचा ताबा तनपुरे गटाने घेतला असला, तरी अद्याप तो सुरू करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.
advertisement
स्थानिक राजकारणात बदलते समीकरण
कारखान्याच्या घडामोडीनंतर तनपुरे कुटुंबातील काही सदस्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याची चर्चा आहे. विशेषतः अरुण तनपुरे यांच्या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होत असल्याचे बोलले जाते.
थेट लढतीची शक्यता
अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. ती झाल्यास राहुरीत ‘तनपुरे विरुद्ध कर्डिले’ अशी थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 12:22 PM IST
मराठी बातम्या/Politics/
राहुरीची पोटनिवडणुक बिनविरोध नाहीच! भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच पवारांनी टाकला डाव,'या' शिलेदाराची चर्चा








