घरच्यांना भेटण्याच्या ओढीने पुण्याला निघाला; पण मुंबईत ट्रेनमध्येच घडलं भयानक, तरुणाचा मृत्यू
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सिद्धांतला वडिलांनी या शनिवार-रविवारी गावाकडे न येता पुढील आठवड्यात येण्याचा आग्रह केला होता. मात्र, घरच्यांना भेटायचं असल्यानं तो सुट्टी घेऊन पुण्याकडे येत होता.
पुणे : बारामतीच्या वाणेवाडी येथील सिद्धांत ज्ञानेश्वर जगताप या 23 वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईहून पुण्याला येताना बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. सिद्धांत ज्ञानेश्वर जगताप असं घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो मुंबईतील ज्ञानदीप सहकारी बँकेत लेखनिक (क्लर्क) म्हणून कार्यरत होता.
शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी सुट्टी असल्याने तो कोयना एक्स्प्रेसने मुंबईहून पुण्याकडे येत होता. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास, बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर सिद्धांत अज्ञात कारणाने धावत्या रेल्वेतून खाली रेल्वे रुळावर पडला. यावेळी डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं नातेवाइकांनी सांगितलं.
advertisement
रेल्वे पोलिसांनी सिद्धांतच्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. सिद्धांत हा सोरटेवाडी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते डी. वाय. जगताप यांचा मुलगा होता. नम्र स्वभाव आणि सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने त्याचा गावात मोठा जनसंपर्क होता. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला दोन वर्षापूर्वी बँकेत नोकरी मिळाली होती. सिद्धांतला वडिलांनी या शनिवार-रविवारी गावाकडे न येता पुढील आठवड्यात येण्याचा आग्रह केला होता. मात्र, घरच्यांना भेटायचं असल्यानं तो सुट्टी घेऊन पुण्याकडे येत होता.
advertisement
सिद्धांतच्या अपघाती निधनानं जगताप कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सोरटेवाडी आणि वाणेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तो कोणत्या कारणाने रेल्वे रुळावर पडला, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही. मात्र, या घटनेत तरुण मुलाला गमावल्यामुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 24, 2025 9:22 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
घरच्यांना भेटण्याच्या ओढीने पुण्याला निघाला; पण मुंबईत ट्रेनमध्येच घडलं भयानक, तरुणाचा मृत्यू


