पुण्यात रक्तरंजित थरार, 'तू पोलिसांचा खबरी' म्हणत तरुणावर तिघांचा जीवघेणा हल्ला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर तीन जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे.
पुणे: पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर तीन जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. संबंधित तरुण सायंकाळी घरी जात असताना तिघांनी त्याचा रस्ता अडवला आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित पीडित तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तिघा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा (FIR) नोंदवला आहे. हल्लेखोर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
किराणा घेऊन घरी जाताना अडवले
या प्रकरणातील तक्रारदार तरुण हा व्यवसायाने ट्रकचालक असून, तो कात्रजमधील खोपडेनगर परिसरात वास्तव्याला आहे. हल्ल्याच्या दिवशी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास तो एका किराणा मालाच्या दुकानातून साहित्य घेऊन आपल्या घरी निघाला होता. याचवेळी, रस्त्यात तिघा अज्ञातांनी त्याला अचानक अडवले. कोणताही कारण नसताना त्यांनी या तरुणाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
"आमची माहिती पोलिसांना का दिली?"
तरुणाला अडवल्यानंतर आरोपींनी "तू आमची माहिती पोलिसांना का दिलीस? तू पोलिसांचा खबरी आहेस," असा जाब विचारायला सुरुवात केली. तसेच त्याला अश्लील शब्दांत शिवीगाळ केली. यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर, आरोपींनी कोणताही विचार न करता सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तरुणावर वार केले.
advertisement
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तातडीने गुन्हा दाखल केला. हा हल्ला नेमका कुणी केला? याची माहिती अद्याप समोर आली नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 1:20 PM IST


