पुण्याच्या संशोधकांची ऐतिहासिक कामगिरी, अलकनंदा नावाच्या सर्पिल दीर्घिकेचा असा लावला शोध, Video

Last Updated:

प्रारंभिक काळात अस्तित्वात असलेल्या अलकनंदा नावाच्या सर्पिल दीर्घिकेचा शोध लावला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही दीर्घिका विश्व केवळ 1.5 अब्ज वर्षांचे असताना पूर्ण विकसित अवस्थेत होती.

+
दीर्घिका 

दीर्घिका 

पुणे : भारतीय खगोलशास्त्र क्षेत्रासाठी अभूतपूर्व ठरणारी कामगिरी पुण्यातील संशोधकांनी साध्य केली आहे. टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (NCRA) संशोधक राशी जैन आणि योगेश वाडदेकर यांनी नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) च्या डेटाचे विश्लेषण करताना विश्वातील सर्वात दूरच्या आणि प्रारंभिक काळात अस्तित्वात असलेल्या अलकनंदा नावाच्या सर्पिल दीर्घिकेचा शोध लावला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही दीर्घिका विश्व केवळ 1.5 अब्ज वर्षांचे असताना पूर्ण विकसित अवस्थेत होती.
संशोधनाचा प्रवास साधारण दोन वर्षांपूर्वी सुरू झाला. JWST च्या UNCOVER सर्व्हे मधील रेडशिफ्ट 4 पेक्षा जास्त मूल्य असणाऱ्या अंदाजे 2700 वस्तूंच्या अभ्यासादरम्यान राशी जैन या विद्यार्थिनीने ही आगळीवेगळी रचना असलेली दीर्घिका अपघाताने ओळखली. फेब्रुवारी 2024 मध्ये प्रथमच ही दीर्घिका त्यांच्या निदर्शनास आली. पुढील दीड वर्ष सूक्ष्म तपासणी, विश्लेषण आणि मॉडेलिंग करून यावर सखोल संशोधन करण्यात आले. अखेर हा शोधलेख आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित जर्नल Astronomy & Astrophysics मध्ये प्रकाशित झाला.
advertisement
अलकनंदा ही सुमारे 12 अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे आणि तिचे रेडशिफ्ट मूल्य जवळपास 4 आहे. याचा अर्थ, आज आपण पाहत असलेला तिचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 12 अब्ज वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यामुळे आपण तिला आज पाहतो तेव्हा ती प्रत्यक्षात महास्फोटानंतर केवळ 1.5 अब्ज वर्षांनी जशी होती तशीच दिसते. त्या काळात इतक्या रेखीव, परिपूर्ण सर्पिल रचनेची दीर्घिका अस्तित्वात येणे अविश्वसनीय मानले जाते.
advertisement
जैन आणि वाडदेकर यांनी दीर्घिकेला अलकनंदा हे नाव विशेष विचार करून दिले. मंदाकिनी नदी ही गंगेची महत्त्वाची उपनदी आणि हिंदी भाषेत आकाशगंगेचे नाव देखील मंदाकिनी असल्याने, तिच्या भगिनी नदीचे नाव या नवीन दीर्घिकेला देणे योग्य ठरेल असे संशोधकांना वाटले.
JWST च्या अवरक्त प्रकाशातील अद्वितीय रिझोल्यूशनमुळे अलकनंदा दीर्घिकेची दोन सममित, स्पष्ट सर्पिल भुजा दिसून येतात, ज्या आकाशगंगेप्रमाणेच व्यवस्थित रचलेल्या आहेत. विश्वाच्या प्रारंभिक टप्प्यात अशी मोठी, उच्च वस्तुमानाची, वेगाने तारा निर्माण करणारी दीर्घिका आढळणे अत्यंत दुर्मिळ आहे. दीर्घिका निर्मितीच्या सिद्धांतानुसार, अशा भव्य सर्पिल रचना घडण्यास सहसा तीन अब्ज वर्षांहून अधिक काळ अपेक्षित असतो.
advertisement
मात्र अलकनंदा दीर्घिकेने सिद्धांतांनाच आव्हान देत केवळ दीड अब्ज वर्षांत विकसित स्वरूप घेतले आहे. त्यामुळे विश्वाच्या उत्क्रांती, तारा-निर्मितीचा वेग आणि प्रारंभिक कोस्मिक संरचना याविषयी नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
1994 पासून खगोलभौतिकी संशोधनात कार्यरत असलेल्या योगेश वाडदेकर यांचा 31 वर्षांचा अनुभव आणि तरुण संशोधक राशी जैन यांचे परिश्रम यामुळे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा शोध साकारला. विश्वाच्या बालपणी भव्य सर्पिल दीर्घिका कशा तयार झाल्या असतील, याविषयी जागतिक खगोलशास्त्र समुदायात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अलकनंदा विश्वाच्या इतिहासातील एक प्राचीन, भव्य आणि वैज्ञानिकदृष्ट्या परिवर्तन घडवणारी दीर्घिका यामुळे पुण्याचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर उजळले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या संशोधकांची ऐतिहासिक कामगिरी, अलकनंदा नावाच्या सर्पिल दीर्घिकेचा असा लावला शोध, Video
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement