बनेश्वर मंदिर परिसरात धक्कादायक घटना; मधमाशांचे पोळे काढायला मध्यरात्री झाडावर चढलेल्या तरुणाचा गेला जीव, काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
बनेश्वर मंदिर परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील झाडांवर मधमाशांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. यासाठी बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हे पोळे काढण्याचे काम सुरू होते
पुणे : ऐतिहासिक बनेश्वर मंदिर परिसरात एक हृदयद्रावक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. झाडावरील मधमाशांचे पोळे काढताना विष्णू मारुती पवार या तरुणाचा उंचावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आता जबाबदारी झटकण्याचे राजकारण सुरू झाले आहे. वनविभाग आणि देवस्थान ट्रस्ट एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचा आरोप होत आहे.
नेमकी घटना काय?
बनेश्वर मंदिर परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील झाडांवर मधमाशांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. यासाठी बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हे पोळे काढण्याचे काम सुरू असताना विष्णू पवार झाडावरून खाली कोसळला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
प्रशासनाचा निष्काळजीपणा?
सत्यशोधक बहुजन आघाडीचे सचिव गणपत काटेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गंभीर आरोप केले आहेत. पोळे काढण्यासाठी अग्निशमन दल किंवा तज्ज्ञांची मदत घेण्याऐवजी, आदिवासी समाजातील तरुणांना कोणत्याही सुरक्षिततेशिवाय कामाला लावल्याचे समोर येत आहे. वनविभागाने "आमच्याकडे तज्ज्ञ नाहीत" असे सांगून हात वर केले. तर ट्रस्टने घाईघाईने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
advertisement
वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी स्पष्ट केले की, "आमच्याकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने आम्ही ट्रस्टला लेखी कळवले होते. या घटनेला वनविभाग जबाबदार नाही." मात्र, एका गरीब तरुणाचा जीव गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 11:09 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
बनेश्वर मंदिर परिसरात धक्कादायक घटना; मधमाशांचे पोळे काढायला मध्यरात्री झाडावर चढलेल्या तरुणाचा गेला जीव, काय घडलं?









