Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर 3 महिने दर्शनासाठी राहणार बंद? 'या' कारणामुळे मोठा निर्णय
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने भीमाशंकर परिसरात भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे स्थान असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला आहे. २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने भीमाशंकर परिसरात भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या काळात होणारी ही संभाव्य गर्दी आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी शासनाने २८८.१७ कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा मंजूर केला आहे. या अंतर्गत होणाऱ्या बांधकामांना आणि विकासकामांना गती देण्यासाठी मंदिर परिसर बंद ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
या संदर्भात आंबेगाव-जुन्नरचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भीमाशंकर येथे एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत स्थानिक ग्रामस्थ, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वाराणसी, अयोध्या आणि उज्जैन येथील तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर भीमाशंकरचा विकास करताना भाविकांची सुरक्षितता आणि सुलभ दर्शन व्यवस्था यावर भर दिला जाणार आहे. विकासकामांच्या ओघात भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आणि कामाचा दर्जा राखण्यासाठी तीन महिने दर्शन बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर ग्रामस्थांनीही सकारात्मक सहमती दर्शवली आहे.
advertisement
या बैठकीचा सविस्तर अहवाल आणि ग्रामस्थांची सहमती लवकरच पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर अधिकृत शिक्कामोर्तब केल्यानंतर मंदिर नेमके कोणत्या तारखेपासून बंद राहील, याबाबतचा लेखी आदेश प्रसिद्ध केला जाईल. या कालावधीत केवळ विकासकामांना प्राधान्य दिले जाणार असून, कुंभमेळ्यापूर्वी हे क्षेत्र सर्व सोयींनी सज्ज करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. बैठकीसाठी खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे आणि देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर 3 महिने दर्शनासाठी राहणार बंद? 'या' कारणामुळे मोठा निर्णय








