रुग्णालयातून बरं होऊन घरी जाताना मृत्यूनं गाठलं, पुणे विमानतळाजवळ दीर-भावजयीचा दुर्दैवी मृत्यू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Pune Car Bike Accident: पुण्यातील विमानतळाच्या परिसरात एका अपघातात दीर भावजयीचा मृत्यू झाला आहे.
पुणे : पुण्यातील विमानतळाच्या परिसरात एका अपघातात दीर भावजयीचा मृत्यू झाला आहे. एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना दोघांना मृत्यूनं गाठलं आहे. दुचाकी आणि चार चाकी गाडीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास येरवडा ते विमानतळ रस्त्यावर झाला.
आशीर्वाद नागेश गोवेकर (वय 52 रा. मापसा, गोवा) आणि रेश्मा रमेश गोवेकर (वय 66 रा. भैरव नगर, पुणे) असं अपघातात मृत पावलेल्या दीर-भावजय यांची नावं आहेत. अपघातानंतर दीर आशीर्वाद गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेश्मा यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघाताची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
advertisement
याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईबा पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मयत आशीर्वाद गोवेकर आणि रेश्मा गोवेकर हे नात्याने दीर-भावजय आहेत. गुरुवारी रेश्मा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना एअर फोर्सच्या ईसीएच रुग्णालयात नेण्यात आलं होतं. उपचारानंतर दीर आशीर्वाद गोवेकर आपल्या भावजयीला घेऊन घरी निघाले होते.
रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते येरवडा ते विमानतळ या मुख्य रस्त्यावरून उजवीकडे (फाईव्ह नाइन चौक) वळत होते. दुचाकी वळण घेतं असताना येरवड्याच्या दिशेने जाणारी बस आणि इतर वाहनं थांबली होती. याच दरम्यान फाईव्ह नाइनच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा एसयूव्ही कारने थांबलेल्या बस व इतर वाहनांना ओव्हर टेक केलं. यावेळी दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, आशीर्वाद गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर रेश्मा गोवेकर या गंभीर जखमी झाल्या. त्यांना जखमी अवस्थेत जवळील ईसीएच रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र इथे उपचार सुरू असताना रेश्मा यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मयत रेश्मा यांच्या मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 03, 2025 10:54 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रुग्णालयातून बरं होऊन घरी जाताना मृत्यूनं गाठलं, पुणे विमानतळाजवळ दीर-भावजयीचा दुर्दैवी मृत्यू