Pune News: बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी अन् मृत्यूशी झुंज; पुण्यातील डॉक्टरांनी 8 वर्षीय मुलाला दिले जीवनदान
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आठ वर्षांच्या मुलाला डॉक्टरांनी वेळेवर करून जीवनदान दिले.
पुणे: बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आठ वर्षांच्या मुलाला डॉक्टरांनी वेळेवर करून जीवनदान दिले. पुण्यातील डॉक्टरांनी वेळेवर आणि अचूक उपचार करून जीवनदान दिलेला आठ वर्षीय मुलगा अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. मानेतील मेंदूकडे रक्त पुरवठा करणाऱ्या प्रमुख धमनीला इजा होऊन ती फाटल्यामुळे मुलाचा जीव धोक्यात आला होता. मात्र, अत्याधुनिक कॅरोटिड स्टेंटिंग शस्त्रक्रियेमुळे हा धोका टळला.
घटनेच्या दिवशी बिबट्याने अचानक मुलावर झडप घालत त्याची मान पकडून त्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत मुलाचे वडील दुचाकीवरून सतत हॉर्न वाजवत बिबट्याच्या मागे गेले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बिबट्याने काही अंतरावर मुलाला सोडून दिले. जखमी अवस्थेत मुलाला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमा अतिशय गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुण्यातील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले.
advertisement
इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. आनंद आलुरकर यांनी सांगितले की, "बिबट्याच्या हल्ल्यामुळे मुलाच्या मानेतील कॅरोटिड धमनी फाटली होती. त्या ठिकाणी रक्त साचून फुगवटा निर्माण झाला होता. या अवस्थेला स्युडो ॲन्युरिझम असे म्हटले जाते. ही स्थिती अत्यंत धोकादायक असून अचानक रक्तस्राव होण्याचा धोका असतो. डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (DSA) तपासणीतून हा गंभीर दोष स्पष्ट झाला. यानंतर कॅथलॅबमध्ये बिनटाक्याची कॅरोटिड स्टेंटिंग शस्त्रक्रिया करण्यात आली. "
advertisement
डॉ. आलुरकर यांनी पुढे सांगितले की, "जांघेतील रक्तवाहिनीतून कॅथेटरद्वारे मेंदूकडे जाणाऱ्या धमनीतील छिद्रावर कव्हर्ड स्टेंट ग्राफ्ट बसवून ते बंद करण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. उपचारानंतर मुलाची प्रकृती झपाट्याने सुधारली आणि अवघ्या दोन दिवसांत त्याला घरी सोडण्यात आले. कॅरोटिड स्टेंटिंग ही प्रक्रिया प्रामुख्याने वयोवृद्ध स्ट्रोक रुग्णांमध्ये केली जाते. मात्र, इतक्या लहान वयाच्या मुलावर ही शस्त्रक्रिया करणे दुर्मीळ आणि अत्यंत आव्हानात्मक होते. तरीही वैद्यकीय पथकाच्या कौशल्यामुळे मुलाचा जीव वाचवणे शक्य झाले."
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 9:00 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी अन् मृत्यूशी झुंज; पुण्यातील डॉक्टरांनी 8 वर्षीय मुलाला दिले जीवनदान











