पुण्यातून परदेशात पाठवला दिवाळीचा फराळ, कोणकोणत्या देशांत पाठवले सर्वाधिक फराळ

Last Updated:

Diwali 2025: दिवाळीनिमित्त घराघरात फराळ तयार होत असताना, परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांनाही या सणाचा गंध अनुभवता यावा यासाठी पुणे पोस्ट विभागाकडून ‘दिवाळी फराळ मोहीम’ राबविण्यात आली आहे.

+
दिवाळी

दिवाळी फराळ 

पुणे: दिवाळीचा सण म्हणजे आनंद, आपुलकी आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी. घराघरात फराळ तयार होत असताना, परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांनाही या सणाचा गंध अनुभवता यावा यासाठी पुणे पोस्ट विभागाकडून ‘दिवाळी फराळ मोहीम’ राबविण्यात आली आहे. 22 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत तब्बल 10 टनांहून अधिक फराळ विदेशात पाठविण्यात आला असून, जपान, जर्मनी आणि युके या देशांत सर्वाधिक पार्सल पाठविण्यात आले आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून ही मोहीम राबविण्यात येत असून, दरवर्षी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी केवळ दोन टन फराळ विदेशात पाठविण्यात आला होता.मात्र यंदा तो आकडा तब्बल पाचपट वाढून 10 टनांवर पोहोचला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा स्वाद आणि संस्कृती परदेशातील मराठी कुटुंबांपर्यंत पोहोचत आहे.
पोस्टाचे प्रादेशिक संचालक अभिजीत बनसोडे यांनी सांगितले की परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायानिमित्ताने स्थायिक झालेल्या आपल्या नागरिकांना घरच्या सणाचा आनंद लुटता यावा, हीच या मोहिमेची पउद्देश आहे. 2023 मध्ये या उपक्रमाला सुरूवात झाली आणि त्या वेळी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी या कल्पनेला इतका उत्तम प्रतिसाद दिला की मागील वर्षांच्या तुलनेत यंदा पार्सलची संख्या आणि वजन दोन्ही दुप्पट वाढले आहे.
advertisement
यंदा 22 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मोहिमेत आत्तापर्यंत 1141 पार्सल विदेशात पाठविण्यात आली आहेत. त्यात सर्वाधिक जपानमध्ये 221, जर्मनीत 172, युकेमध्ये 120 आणि ऑस्ट्रेलियात 104 पार्सल पाठविण्यात आली आहेत. याशिवाय अमेरिका, कॅनडा, गल्फ देश आणि सिंगापूरकडूनही मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. नुकत्याच अमेरिकेकडून लागू करण्यात आलेल्या टॅरिफ शुल्कानंतर काही दिवस थांबलेली पाठवणी आता पुन्हा सुरू झाली असून, गेल्या दोन दिवसांत 50 हून अधिक पार्सल अमेरिकेत रवाना झाली आहेत.
advertisement
पोस्ट विभागाकडून फक्त ड्राय पदार्थांचे पार्सल स्वीकारले जातात, द्रवपदार्थ पाठविण्यास मनाई आहे. लाडू, चकली, करंजी, शंकरपाळे, चिवडा, अनारसे यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश असलेल्या या फराळाच्या पार्सलचे पॅकिंग पोस्ट कर्मचाऱ्यांकडूनच काळजीपूर्वक करण्यात येते, जेणेकरून पार्सल सुरक्षित पोहोचेल.
बनसोडे पुढे म्हणाले, गेल्या तीन वर्षांत नागरिकांचा विश्वास आणि प्रतिसाद पाहता आम्ही या मोहिमेचा विस्तार राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही केला आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात यंदा आणखी दोन टन फराळ विदेशात पाठविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
advertisement
या मोहिमेमुळे पुण्याचे पोस्ट विभाग परदेशात राहणाऱ्या हजारो मराठी कुटुंबांना त्यांच्या मुळाशी जोडत आहे. पुणे पोस्ट विभागाची दिवाळी फराळ मोहीम ही केवळ पोस्टल सेवा नसून भावनिक बंध जपणारा सामाजिक उपक्रम ठरली आहे. परदेशात असलेल्या मराठी जनतेला आपल्या मातीतल्या सणाचा सुगंध अनुभवता यावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातून परदेशात पाठवला दिवाळीचा फराळ, कोणकोणत्या देशांत पाठवले सर्वाधिक फराळ
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement