मुंबईला उगीच बदनाम केलंय! वाहतूक कोंडीत 18 व्या स्थानावर, तर पुणे कितव्या क्रमांकावर?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
टॉम टॉम अहवालानुसार पुणे ट्रॅफिक कोंडीत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबई १८ व्या, बंगळुरू दुसऱ्या तर मेक्सिको सिटी पहिल्या क्रमांकावर आहे. सुधारणा असूनही पुणेकरांचा संघर्ष कायम.
अभिजित पोते, प्रतिनिधी पुणे: पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी हा काही नवीन विषय नाही, पण आता यावर जागतिक शिक्कामोर्तब झालं आहे. जगभरातील शहरांमधील ट्रॅफिकचा अभ्यास करणाऱ्या 'टॉम टॉम या संस्थेने आपला ताजा अहवाल प्रसिद्ध केला असून, यामध्ये पुणे शहर जगात पाचव्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. पुण्यातील रस्ते आणि तिथली वाहनसंख्या पाहता हे आकडे पुणेकरांच्या रोजच्या संघर्षाची साक्ष देतात.
पुण्यात काय परिस्थिती?
पुण्याची ही रँकिंग पाहताना एक गोष्ट लक्षात येते की, गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्याच्या स्थितीत अंशतः सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी पुणे जगात चौथ्या स्थानी होतं, ते आता पाचव्या क्रमांकावर आलं आहे. ही सुधारणा कागदावर दिसत असली तरी, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यावर पुणेकरांना होणारा त्रास काही कमी झालेला नाही. शहराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना आजही नागरिकांना तासनतास सिग्नलवर उभं राहावं लागत आहे.
advertisement
५० मिनिटं तुम्ही ट्रॅफिकमध्येच अडकता
या अहवालातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे प्रवासाचा वेग. पुण्यात सरासरी ४.५ किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तब्बल १५ मिनिटांचा वेळ खर्च करावा लागतो. याचाच अर्थ, जर तुम्हाला १० ते १२ किलोमीटरचा प्रवास करायचा असेल, तर तुमचे आयुष्यातील किमान ४० ते ५० मिनिटं फक्त ट्रॅफिकमध्येच जाणार आहेत. ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच या संथ वेगाचा फटका बसत आहे.
advertisement
मुंबई कितव्या स्थानावर?
दुसरीकडे, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने पुण्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुंबई वाहतूक कोंडीच्या जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानावर आहे. मात्र, भारतातील आयटी हब मानल्या जाणाऱ्या बंगळुरूची अवस्था पुण्यापेक्षाही भयानक आहे. बंगळुरू शहर जगात दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे ट्रॅफिकची समस्या अतिशय गंभीर बनली आहे. तर मेक्सिको सिटीने ट्रॅफिकच्या बाबतीत जगात पहिला क्रमांक पटकावला आहे.
advertisement
पुणे पाचव्या क्रमांकावर येण्यामागे मेट्रोची संथ कामं, उड्डाणपुलांचे सुरू असलेले प्रकल्प आणि अरुंद रस्ते ही प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. प्रशासनाने केलेल्या काही उपाययोजनांमुळे पुण्याचा क्रमांक एका पायरीने खाली घसरला असला, तरी पुणेकरांना खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेण्यासाठी अजून बराच काळ वाट पाहावी लागणार आहे, हेच या अहवालावरून स्पष्ट होतंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 10:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबईला उगीच बदनाम केलंय! वाहतूक कोंडीत 18 व्या स्थानावर, तर पुणे कितव्या क्रमांकावर?









