'या सोसायटीत प्रचार करायचा नाही', पिंपरीत राष्ट्रवादी - भाजप भिडले; गेटवरच मोठा राडा
- Reported by:Govind Wakde
- Published by:Prachi Amale
Last Updated:
निवडणुकीच्या प्रचारावरुन राष्ट्रवादी काँग्रेल आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा राडा झाला
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच, प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा गोंधळ उडाला. प्रचारादरम्यान झालेल्या या वादामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या सुमारास भाजपचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते संबंधित प्रभागातील एका गृहनिर्माण सोसायटीत प्रचारासाठी गेले होते. मात्र, या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी भाजप उमेदवारांनी या सोसायटीत प्रचार करू नये, अशी भूमिका घेतली. याच कारणावरून राष्ट्रवादीच्या समर्थकांनी थेट सोसायटीच्या मुख्य गेटला टाळे ठोकले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले.
advertisement
व्हिडीओ व्हायरल
टाळा लावल्याच्या प्रकारावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाला. काही काळ घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप सुरू होते. या वादाचे चित्रीकरण परिसरातील नागरिकांनी मोबाईलमध्ये केले असून संबंधित घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
पोलिसांची मध्यस्ती अन् कार्यकर्त्यांची माघार
वाद वाढत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्हीकडील कार्यकर्ते घटनास्थळावरून परत गेल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हिंसक घटना किंवा जखमी झाल्याची नोंद झालेली नाही.
advertisement
Watch Video :
प्रचारादरम्यान वाढणाऱ्या तणावावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, या प्रकारामुळे निवडणूक प्रचारादरम्यान वाढणाऱ्या तणावावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक आयोग आणि पोलिस प्रशासनाने प्रचारादरम्यान नियमांचे पालन करण्याबाबत अधिक कडक भूमिका घ्यावी, अशी मागणीही यानिमित्ताने पुढे येत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 3:44 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'या सोसायटीत प्रचार करायचा नाही', पिंपरीत राष्ट्रवादी - भाजप भिडले; गेटवरच मोठा राडा










