अवकाळी पावसातच पुण्याचे रस्ते 'जलमय'; 12 तासाच्या आत मोठा निर्णय, अंतर्गत रस्ते आता सिमेंटचे नाही तर 'असे' असणार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अवकाळी पावसातच शहरात अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं. हेच रोखण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.
पुणे: शहरातील अरुंद रस्ते आणि गल्ली-बोळांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. अवकाळी पावसातच शहरात अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं. हेच रोखण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. यापुढे शहरातील १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटचे न करता ते केवळ डांबरीच केले जातील, असा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे. खड्डेमुक्त रस्त्यांच्या नादात होणारे काँक्रिटीकरण आता पावसाळी पाण्याचा निचरा होण्यात अडथळा ठरत असल्याचे मान्य करत प्रशासनाने हा बदल केला आहे.
का घेतला हा निर्णय?
पाण्याचा निचरा होण्यास अडथळा: सिमेंटच्या रस्त्यांवरून पाणी जमिनीत मुरत नाही. ज्या ठिकाणी पावसाळी गटारे नाहीत, तिथे मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर तळी साचतात. हे पाणी नागरिकांच्या घरात आणि पार्किंगमध्ये शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
सेवावाहिन्यांचे खोदकाम: अंतर्गत रस्त्यांवर वारंवार ड्रेनेज, पाणीपुरवठा किंवा केबल टाकण्यासाठी खोदाई करावी लागते. काँक्रिटचा रस्ता एकदा खोदावा लागला की तो पुन्हा दुरुस्त करणे खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण असते.
advertisement
अरुंद रस्त्यांची स्थिती: पुण्यात सुमारे ९०० किलोमीटर लांबीचे ६ ते १२ मीटर रुंदीचे रस्ते आहेत. यापैकी अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे काँक्रिटीकरण समस्या वाढवणारे ठरत होते.
आयुक्तांचे स्पष्ट आदेश
महापालिका आयुक्तांनी पथ विभागाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, साडेसात मीटरपर्यंतच्या सर्व रस्त्यांवर प्राधान्याने डांबरीकरणच करावे. जोपर्यंत सर्व आवश्यक सेवावाहिन्यांची कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत काँक्रिटीकरण टाळावे. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य यंत्रणा विकसित करण्यावर भर द्यावा. यंदाच्या अवकाळी पावसाने शहरातील रस्ते व्यवस्थेतील त्रुटी उघड केल्या होत्या. भिंती कोसळण्याच्या आणि पार्किंगमध्ये पाणी शिरण्याच्या घटनांनंतर प्रशासनावर मोठा दबाव होता. या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय पुणेकरांसाठी दिलासादायक मानला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 11:34 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
अवकाळी पावसातच पुण्याचे रस्ते 'जलमय'; 12 तासाच्या आत मोठा निर्णय, अंतर्गत रस्ते आता सिमेंटचे नाही तर 'असे' असणार










