केबीसीमध्ये बिग बींना उद्धट बोलणाऱ्या मुलाला संस्कार आणि संवाद शिक्षणाची गरज, मानसोपचार तज्झांचे मत
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
अत्यंत लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. या शो दरम्यान एका लहान मुलाने महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
पुणे: अत्यंत लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. या शो दरम्यान एका लहान मुलाने महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. या घटनेनंतर अनेकांनी त्या मुलाच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास या घटनेतून पालकत्व आणि लहानपणीच्या संस्कारांची महत्त्वाची बाजू अधोरेखित होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शालेय मानसोपचार तज्ज्ञ गायत्री सहस्त्रबुद्धे यांनी या संदर्भात महत्त्वाचे निरीक्षण व्यक्त केले. त्या म्हणाल्या, त्या मुलाला कोणताही मानसिक आजार आहे असे वाटत नाही. पण आजच्या मुलांचा मानसिक दृष्टिकोन, संवाद पद्धती आणि वर्तन यामध्ये बदल दिसून येतो आहे. लहानपणापासूनच संवाद कौशल्ये, भावनांचे व्यवस्थापन आणि सामाजिक आचारसंहिता यांचे शिक्षण दिले गेले पाहिजे. पूर्वीच्या काळात घरात आजी- आजोबा, आई-वडील यांच्याकडून लहान मुलांना मोठ्यांशी कसे बोलायचे, वागायचे, आदर कसा दाखवायचा याचे संस्कार दिले जात असत. पण आजच्या काळात अनेक कुटुंबात ही परंपरा हरवत चालली आहे.
advertisement
एकुलत्या एक मुलांना जास्त लाड केले जातात, परिणामी त्यांच्या चुका दुरुस्त करण्याकडे पालकांचे दुर्लक्ष करतात. त्यामुळे संवाद आणि वर्तन या दोन्हीही गोष्टींच्या बाबतीत मुलांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव जाणवू लागला आहे, असे सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या, आजच्या डिजिटल युगात मुलांना पालकांकडून सोशल मीडियाचा वापर करण्यास मोकळीक असते. परंतु त्यावर ते काय पाहतात, कोणत्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या मनावर पडतो? याकडे पालकांनी लक्ष द्यावे. घरात दररोज किमान 15 ते 20 मिनिटे मुलांशी संवाद साधावा. त्यांच्या विचारविश्वाबद्दल, भावना आणि दृष्टीकोनाबद्दल खुलेपणाने बोलावे.
advertisement
सहस्त्रबुद्धे यांच्या मते, शाळांमध्येही मुलांना संवाद कौशल्ये, भावनांचे नियंत्रण आणि मूल्य शिक्षण यावर भर देणे आवश्यक आहे. कारण अशा कौशल्यांमुळेच मुलांमध्ये संवेदनशीलता, आत्मविश्वास आणि योग्य सामाजिक आचारसंहिता विकसित होते. मुलांशी योग्य प्रकारे संवाद साधणे, त्यांना ऐकून घेणे आणि योग्य मार्गदर्शन देणे या गोष्टी त्यांच्या मानसिक विकासासाठी अत्यावश्यक आहेत, असे त्या म्हणाल्या. या घटनेतून पालक, शिक्षक आणि समाज यांना एक संदेश मिळतो. केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नाही, तर भावनिक आणि सामाजिक शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे.
advertisement
आजची पिढी अत्याधुनिक तंत्रज्ञानात रमली असली तरी मानवी मूल्यांचे बीज लहानपणीच पेरले गेले पाहिजे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. शेवटी, कौन बनेगा करोडपती मधील ही घटना एखाद्या मुलाच्या वर्तनाचा मुद्दा नसून संपूर्ण समाजाने आपल्या पुढच्या पिढीला दिलेल्या संस्कारांचे आरसे दाखवणारी ठरली आहे. योग्य संवाद, संस्कार आणि पालकांचे मार्गदर्शन हेच अशा प्रसंगांना टाळण्याचे खरे उत्तर आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 15, 2025 8:33 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
केबीसीमध्ये बिग बींना उद्धट बोलणाऱ्या मुलाला संस्कार आणि संवाद शिक्षणाची गरज, मानसोपचार तज्झांचे मत